आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सीबीअाय तपासाची माहिती माध्यमांना मिळतेच कशी? हायकोर्टाने खडसावले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - डाॅ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्याप्रकरणी सुरू असलेल्या तपासातील अनेक संवेदनशील आणि गोपनीय माहिती प्रसार माध्यमांपर्यंत पोहाेचत असल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला खडे बोल सुनावले. हे प्रकार थांबले नाहीत तर संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला. पानसरे हत्या प्रकरणाचा तपास तूर्त पोलिसांचे विशेष तपास पथकच करेल, असेही उच्च न्यायालयाने स्पष्ट केले.

डाॅ. दाभोलकर हत्याप्रकरणी आजवर झालेल्या तपासाचा सीलबंद प्रगती अहवाल सीबीआयने गुरुवारी उच्च न्यायालयाचे न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. शालिनी फणसाळकर-जोशी यांच्यासमोर सादर केला. या गुन्ह्याची उकल होण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाचे धागेदोरे सापडल्याचा दावा सीबीआयच्या वतीने करण्यात आला. एकूण तपासाची व्याप्ती वाढली असून पुढील तपास करण्याकरिता आपल्याला आणखी ६ आठवड्यांचा कालावधी देण्याची विनंतीही सीबीआयने न्यायालयाला केली. सीबीआय तपासातील प्रगती आम्ही प्रसारमाध्यमांमधून पाहतोच आहोत, असा टोला लगावत हायकोर्टाने सीबीआयला फटकारले. या प्रकरणातील मुख्य साक्षीदाराला सुरक्षा पुरवण्यात सीबीआय अपयशी ठरल्याचे निरीक्षणही उच्च न्यायालयाने नोंदवले.

आरोपींच्या थेट चित्रणावर आक्षेप
आराेपींचे थेट चित्रण प्रसारमाध्यमे करत आहेत. अशा पद्धतीने तपास चालला तर फरार आरोपींना माहिती कळेल आणि तपासावर त्याचा परिणाम हाेईल, असे स्पष्ट करून उच्च न्यायालयाने तपास यंत्रणांकडून अधिक गांभीर्याची अपेक्षा असल्याचे सांगितले. हे प्रकार त्वरित थांबले पाहिजेत, अन्यथा तपासावर देखरेख बंद करू, असे सुनावत तपासाची माहिती माध्यमांना पुरवणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईचे संकेतही उच्च न्यायालयाने दिले.

न्यायवैद्यक अहवाल लवकर मिळवा
हत्येसाठी जी शस्त्रे वापरण्यात आली त्याच्या तपासणीबाबत न्यायवैद्यक अहवालावरही न्यायालयाने विचारणा केली. यावर अजून अहवाल मिळाला नसल्याचे सीबीआयच्या वतीने सांगण्यात आले. त्यावर ब्रिटनच्या उच्चायुक्तांशी संपर्क करून हा अहवाल लवकरात लवकर मिळवा, अशा सूचना न्यायालयाने दिल्या.

पानसरे हत्येचा तपास विशेष पथकाकडेच
सीबीआयने दाभोलकर प्रकरणात केलेली प्रगती पाहता गोविंद पानसरे हत्या प्रकरणाचा तपासदेखील सीबीआयकडे द्यावा, अशी मागणी पानसरे कुटुंबीयांच्या वतीने उच्च न्यायालयात करण्यात आली. राज्य सरकारचीही यासाठी हरकत नसल्याचे न्यायालयाला सांगण्यात आले. त्यावर सरकारची भूमिका न्यायालयाने विचारली तेव्हा विशेष सरकारी वकील संदीप शिंदे यांनी आपल्याला सरकारच्या वतीने याबाबत काहीही कल्पना दिली गेली नसल्याचे सांगितले. त्यावर तपासात काहीही प्रगती केली नसल्याबद्दल उच्च न्यायालयाने राज्य सरकारच्या वकिलांकडे नाराजी व्यक्त करत तुम्हाला हा तपास सीबीआयकडे का सुपूर्द करावासा वाटतो, याची कारणे स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. तोपर्यंत हा तपास विशेष तपास पथकच करेल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

तावडे-रुद्र पाटील एकत्र राहत हाेते...
दाभोलकर हत्येनंतर रुद्र पाटील व वीरेंद्र तावडे कोल्हापुरात एकत्र राहत होते, अशी खळबळजनक माहिती तावडे याची पत्नी निधी यांनी सीबीआयला दिली आहे. मडगाव येथे झालेल्या स्फोटात मारला गेलेला मलगोंडा पाटील याचा रुद्र हा चुलत भाऊ आहे. निधी सध्या वीरेंद्रपासून िवभक्त असून परदेशात राहते. दाभोलकर व पानसरे हत्यांपूर्वी सारंग अकाेलकर व तावडे यांच्यात ई-मेलवरील संवादाची माहिती हाेती, असेही निधीने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...