आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dabholkar's Killer Not Found Its Failure Of Police, Nawab Malik Critise

दाभोलकरांचे मारेकरी न सापडणे हे पोलिसांचे अपयशच, नवाब मलिक यांची टीका

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मारेक-यांचा अद्यापही तपास न लागणे हे पोलिसांचे अपयश असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी गुरुवारी केली. उपमुख्यमंत्री अजित पवारांपाठोपाठ मलिक यांनीही आता पोलिसांच्या कार्यक्षमतेवर टीका करून आपल्याच पक्षाचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांना लक्ष्य केले आहे.


डॉ. दाभोलकर यांच्या खुनाला पंधरवडा उलटूनही मारेक-यांचा सुगावा लागत नसल्याबद्दल विचारलेल्या प्रश्नावर बोलताना मलिक यांनी हे पोलिसांचेच अपयश असल्याचे सांगितले. काही दिवसांपूर्वीच भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी पुणे पोलिस आयुक्त गुलाबराव पोळ यांची भेट घेऊन दाभोलकरांच्या हत्येचा तपास करण्यास पोलिस सक्षम नसल्याची टीका केली होती. आता खुद्द मलिक यांच्या रूपाने पक्षातूनच टीका होऊ लागल्याने गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्या अडचणीत भर पडली आहे.


मोदींचा डोळा संघावर
पंतप्रधानपद हे नरेंद्र मोदी यांचे लक्ष्य कधीच नव्हते. त्यांचा डोळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या खुर्चीवर होता. त्यांना देशाचे नव्हे, तर केवळ भाजपचे नेते व्हायचे होते, हे त्या पक्षाच्या नेत्यांना कळलेच नाही. भाजप ही संघाचीच राजकीय शाखा आहे. सध्या भाजपवर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरलेले मोदी जी ठरवतील, ती भाजपची दिशा असेल. काही दिवसांनंतर संघाची दिशादेखील तेच ठरवतील, अशी टीका मलिक यांनी केली.


भाजप हा चिडीमारांचा पक्ष
विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवाराला पाठिंबा देण्याच्या भाजपच्या निर्णयावर टीका करताना मलिक यांनी, हा चिडीमारांचा पक्ष असल्याचे म्हटले. लोकांसमोर आणता येईल, असा एकही उमेदवार भाजपकडे नव्हता. त्यामुळे त्यांनी इतरांना पाठिंबा दिला. गोपीनाथ मुंडे यांनी आघाडीची 17 मते फोडल्याचा केलेला दावा फोल आहे हे सांगताना मलिक यांनी 10 मते फुटल्याचे मात्र मान्य केले. ही मते कशी फुटली याचा शोध घेण्याचे काम पक्षाकडून सुरू असल्याची सारवासारव त्यांनी केली.