आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पर्यावरण मंत्रालयाशी चर्चा करुन आंबेडकर स्मारकाचा आराखडा ठरवा- मुख्यमंत्री

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चैत्यभूमी सुशोभिकरण व डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक उभारणी संदर्भात येत्या आठवड्यात केंद्रीय पर्यावरण मंत्रालयासोबत अधिकारी स्तरावर चर्चा करुन याबाबतचा आराखडा मंजूर करुन घ्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना दिले.
चैत्यभूमी सुशोभिकरण व राष्ट्रीय स्मारक उभारणी प्रकल्पासाठी नियुक्त करण्यात आलेल्या सुकाणू समितीच्या आज सह्याद्री अतिथी गृहात झालेल्या आढावा बैठकीत अध्यक्ष पदावरुन मुख्यमंत्री बोलत होते. स्मारकाबाबत समिती सदस्यांनी आपल्या संकल्पना लिखित स्वरुपात सादर कराव्यात अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी याप्रसंगी केली. केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय तसेच सांस्कृतिक कार्य मंत्रालय यांच्याकडूनही काही संकल्पना घेण्याचे त्यांनी सांगितले. विधीमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर या बाबत चर्चा करण्यासाठी आपण दिल्लीला जाणार असल्याचे मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
याप्रसंगी बृहन्मुंबई महानगर पालिका आयुक्त सिताराम कुंटे यांनी प्रस्तावित चैत्यभूमी सुशोभिरण प्रकल्पाबाबत सादरीकरण केले. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण झाले असून दुस-या टप्प्याचे काम कोणी करावयाचे याबाबत निर्णय व्हावयाचा आहे. चार्ल्स कोरिया यांना सुकाणू समितीवर घेतले होते परंतु प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी याबाबत आपली असमर्थता व्यक्त केली आहे. वास्तुविशारद शशि प्रभू यांनी या प्रकल्पाचे संकल्प चित्र तयार केले आहे.
या पूर्वीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे अशोक स्तंभावर सोनेरी रंग देण्याचे काम पूर्ण झाले असून वर्षातून दोनदा हे रंग काम केले जाईल अशी माहिती महापालिका आयुक्तांनी यावेळी दिली. प्रकल्पाची पुढील कामे करण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची विशेष प्राधिकरण म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्राधिकरणाचे आयुक्त यू.पी.एस. मदान यांनी जागतिक पातळीवर वास्तुविशारदांकडून या कामासाठी निविदा मागविण्यात येणार
असल्याचे सांगितले. यासाठी या प्रकल्पाची संकल्पना आधी तयार करावी लागेल असे ते म्हणाले.
मागविलेल्या निविदांमधून एका वास्तूविशारदाची निवड करण्यासाठी निवड समिती नियुक्त करण्यात येईल आणि या समितीत नामवंत वास्तुविशारदांसोबत अन्य क्षेत्रातील अनुभवी व तज्ज्ञ व्यक्तींचा समावेश केला जाईल असेही त्यांनी सांगितले. या बैठकीला मंत्री जयंत पाटील, वर्षा गायकवाड, सचिन अहीर यांच्यासह खासदार एकनाथराव गायकवाड, समितीचे सदस्य जोगेंद्र कवाडे, आनंदराज आंबेडकर, रामदास आठवले, राजेंद्र गवई व मंत्रालयातील संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.