आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dahi Handi Issue At Mumbai, Child Right Commission Comment

दहीहंडीसाठी चिमुकल्यांचे जीव टांगणीला लावू नका- बाल हक्क आयोग

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- दहीहंडीच्या उत्सवादरम्यान लावल्या जाणार्‍या मानवी थरांमध्ये बारा वर्षांखालील मुलांना सहभागी करणे धोकादायक असल्याचे राज्य बाल हक्क आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे 12 वर्षांखालील मुलांच्या दहीहंडीतील सहभागावर बंदी घालण्यासंदर्भात आयोगाने जनतेची मते मागवली आहेत.

दहीहंडी फोडण्यात लहान मुलांचा सहभाग धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे पालकांनीच मुलांना यात सहभागी होऊ देण्यापासून थांबवायला हवे, असे मत महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे सचिन ए. एन. त्रिपाठी यांनी व्यक्त केले. यासंदर्भात तज्ज्ञांकडून सूचना आणि मते मागवली असल्याचेही त्रिपाठी म्हणाले.

आयोगाने यासंदर्भात पोलिसांनाही सात दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. त्याचाही अंतिम निर्णयात विचार केला जाणार आहे. या मुद्दय़ावर चर्चा करण्यासाठी व मते मांडण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावर व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार असून लवकरच ते सुरू केले जाणार आाहे. साकी नाका येथील पवन पाठक यांनी यासंबंधी आयोगाकडे तक्रार केली होती. दहीहंडी उत्सवासाठी राजकीय पक्षांच्या दहीहंडीची मोठी बक्षिसे मिळवण्यासाठी गोविंदांची पथके या मुलांची मदत घेतात. त्यात अनेक मुलांचा जीव धोक्यात असतो. अनेकांनी आजवर जीवही गमावले आहेत. त्यामुळे हे थांबवण्यात येऊन कडक नियम करणे गरजेचे असल्याचे मत पाठक यांनी व्यक्त केले.

पाठक यांनी तक्रारीत 4 ते 10 वयोगटातील मुलांबाबत चिंता व्यक्त केली होती. मात्र, आयोगाचे अध्यक्ष उज्‍जवल उके यांनी मात्र 12 वर्षे वयाच्या मुलांचा सहभाग गरजेचे असल्याचे सांगितले.

लहान मुले सर्वात वर
लहान मुलांचे वजन तुलनेने कमी असल्याने दहीहंडीच्या मानवी मनोर्‍यांमध्ये सर्वात वर या मुलांना चढवले जाते. गेल्या काही वर्षांत दहीहंडीच्या बक्षिसांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे त्याच प्रमाणात दहीहंडीची उंची वाढवली जाते. पर्यायाने गोविंदा पथकांना अधिक थर लावावे लागतात. कारण अधिक थर लावणार्‍या पथकालाच बक्षिसाची रक्कम मिळते. दहीहंडीसाठी मानवी मनोर्‍यात सहभागी होणार्‍या गोविंदांच्या जखमी होण्याचे प्रकार मोठय़ा प्रमाणावर वाढले आहेत. त्यामुळे सुरक्षेचा मुद्दाही ऐरणीवर आला आहे.