आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dahihandi News In Marathi, Mumbai, Supreme Court, Divya Marathi

नियम धाब्यावर बसवून गोविंदांचा ‘थरा’र, पाहा मुंबईतील दहीहंडीची PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सिने कलाकारांचा धांगडधिंगा, बेभान झालेले गोविंदा, आयोजक असलेले अतिउत्साही राजकीय नेते आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात अपयशी ठरलेले पोलिस प्रशासन अशा वातावरणात सोमवारी मुंबई, ठाणे आणि आसपासच्या परिसरात मोठ्या जल्लोषात दहिहंडी उत्सव पार पडला. उच्च न्यायालयाचे निर्देश आणि बालहक्क आयोगांच्या शिफारसी सर्रास धाब्यावर बसवल्याचे चित्र आज जागोजागी पहायला मिळत होते. त्यामुळेच अनेक ठिकाणी 12 वर्षांखालील मुलांचा सहभाग स्पष्ट दिसत असूनसुद्धा त्याकडे पोलिसांनी डोळेझाक केल्याचा आरोप सामाजिक संघटनांनी केला.

सोमवारी मुंबई आणि राज्यात दरवर्षीप्रमाणे दहिहंडीचा उत्साह पाहायला मिळाला. सकाळपासूनच मुंबईतील गोविंदा पथके जथ्थ्या जथ्थ्याने मुंबईतील मानाच्या दहिहंड्यांच्या ठिकाणी हजेरी लावत होती. सर्वोच्च न्यायालयाने यंदा दहिहंडी उत्सव साजरा करण्यासाठी काही अटी आयोजक आणि गोविंदा पथकांना घातल्या होत्या. मात्र, या अटींचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे चित्र आज दिवसभर पहायला मिळाले. विशेष म्हणजे अनेक ठिकाणच्या दहिहंड्यांना सलामी देणारी शेवटच्या थरावरची मुले 12 वर्षांच्या खालील असल्याचे स्पष्ट दिसत असूनसुद्धा पोलिसांना मात्र बघ्याचीच भूमिका घेतली होती. केवळ राजकीय दबावापोटीच पोलिसांनी अशा घटनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप या विरोधात उच्च न्यायालयात याचिका करणा-या स्वाती पाटील यांनी केला आहे. आवाजाच्या मर्यादेचेही अनेक ठिकाणी सर्रास उल्लंघन होत असल्याचे पाहयला मिळाले.

काही अपवाद वगळता जवळपास सर्वच आयोजकांनी सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना पाळल्या नसल्याचेही पाटील म्हणाल्या. याविषयी मुंबई पोलिसांचे जनसंपर्क अधिकारी उपायुक्त महेश पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचे पालन होत असल्याची खातरजमा करण्यासाठी आम्ही पथके नेमली असून त्यांच्याकडे व्हिडिओ कॅमेरे देण्यात आले आहेत. कुणाची त्याबाबत तक्रार आली तर आज केलेल्या चित्रिकरणाच्या आधारे आम्ही उचित कारवाई करू, अशी माहिती महेश पाटील यांनी दिली.

* बारा वर्षांखालील मुलांचा सर्रास सहभाग

* संस्कृती मंडळाने जपली ‘संस्कृती’
शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक यांच्या संस्कृती कला प्रतिष्ठानने यंदा सर्वोच्च् न्यायालयाच्या निर्णयाचे चोख पालन करत एक वेगळा आदर्श घालून दिला. या मंडळातर्फे सलामीसाठी येणा-या गोविंदा पथकांना फक्त सहा थरांचीच मर्यादा घातली होती. तसेच गोविंदांच्या सुरक्षेचे सर्व उपाय या मंडळाने योजले होते. आवाजाची मर्यादा पाळण्यासाठी विशेष दक्षताही त्यांनी घेतली होती. विशेष म्हणजे पूर्वी मध्यरात्रीपर्यंत चालणा-या या उत्सवाचा यंदा मात्र सात वाजताच समारोप करण्यात आला.

* मंत्री आव्हाड, अहिरांनी नियम तोडले
गोविंदांच्या उत्साहाबरोबरच अनेक ठिकाणी आयोजकांचा उत्साहसुद्धा शिगेला पोहोचला होता. मनसेचे राम कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि नगरविकास राज्यमंत्री सचिन अहिर, अपक्ष आमदार गणपत गायकवाड, तसेच राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री जितेंद्र आव्हाड या नेत्यांची हजेरी चर्चेचा विषय ठरली होती. या सर्वांनी न्यायालयाचे नियम तोडल्याचे स्पष्ट दिसले. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही. आव्हाड हे तर उत्साहाच्या भरात थेट गोविंदा पथकातच शिरले आणि दहीहंडीच्या मानवी मनो-यात चौथ्या थरावर चढले.

* एका गोविंदाचा मृत्यू, 94 जण जखमी
दहिहंडीच्या उत्साहाला जखमी गोविंदांचेही गालबोट लागले. मुंबईतील राजेंद्र आंबेकर (49) यांचा नाचताना हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबीयांना संस्कृती कलाप्रतिष्ठानचे अध्यक्ष आमदार प्रताप सरनाईक यांच्या वतीने दोन लाखांची मदत देण्यात आली. मुंबई, ठाणे व नवी मुंबईत 94 गोविंदा जखमी झाले. त्यापैकी 72 गोविंदांवर रुग्णालयात उपचार सुरू असून 20 जणांना घरी सोडण्यात आले. तर नेरूळमध्ये मोटार सायकलवरून जाणा-या दोन गोविदांना इनोव्हा गाडीने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले.
पुढे पाहा मुंबईतील दहीहंडीची छायाचित्रे....