आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दलित पॅंथर चळवळीचा बुरूज कोसळला, महाकवी नामदेव ढसाळ यांचे निधन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दलित पॅंथर चळवळीचे प्रणेते, जेष्ठ साहित्यिक व विचारवंत नामदेव ढसाळ यांचे आज पहाटे चार वाजता मुंबईत निधन झाले. ते 64 वर्षांचे होते. आतड्याच्या कर्करोगामुळे मागील काही वर्षापासून ते आजारी होते. दोन महिन्यांपासून बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, आज पहाटे चार वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. उद्या सकाळी 10 वाजता वडाळ्यातील आंबेडकर कॉलेजमध्ये ढसाळ यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर दुपारी 1 वाजता चैत्यभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
नामदेव ढसाळ यांचा जन्म 15 फेब्रुवारी 1949 रोजी पुण्याजवळील एका खेड्यात झाला. ढसाळांचे बालपण मुंबईतील झोपडपट्ट्यांमध्ये गोलपीठा भागात अत्यंत गरीबीत गेले. ढसाळ यांनी उदरनिर्वाहासाठी मुंबईमध्ये अनेक वर्षे टॅक्सी चालवली. याच काळात त्यांच्यातील कवी, साहित्यिक तयार होत होता. पुढे त्यांनी मराठी दलित साहित्यातील परिवर्तन घडवणारे लेखक आणि दलित चळवळीतील नेते म्हणून ओळख निर्माण केली. दलितांचे, शोषितांचे जीवन स्वतः भोगलेला, अनुभवलेला सिद्धहस्त लेखक, कवी, कादंबरीकार, नाटककार, विचारवंत अशी ओळख पुढे ढसाळ यांनी निर्माण केली.
महानगरीय जीवन आणि बोली भाषा या विषयावरील मराठीतले महत्त्वाचे लेखन त्यांनी केले. अमेरिकन ब्लॅक पँथर चळवळीच्या धरतीवर त्यांनी दलित पँथर ही सशस्त्र संघटना 1972 मध्ये सुरू केली. 1973 मध्ये त्यांचा पहिला कवितासंग्रह 'गोलपीठा' प्रकाशित झाला. यानंतर 'मूर्ख म्हाताऱ्याने डोंगर हलवले' (माओईस्ट विचारांवर आधारित), 'तुझी इयत्ता कंची?', 'खेळ' (शृंगारिक), आणि 'प्रियदर्शिनी' (इंदिरा गांधी यांच्या विषयीचा), या सत्तेत जीव रमत नाही, मी मारले सूर्याच्या रथाचे घोडे सात, तुझे बोट धरुन चाललो आहे, आमच्या इतिहासातील एक अपरिहार्य पात्र : प्रियदर्शिनी, गांडू बगीचा आदी कवितासंग्रह प्रसिद्ध झाले.
याचबरोबर अंधार यात्रा हे नाटक लिहले. हाडकी हाडवळा, निगेटिव्ह स्पेस् या कादंबरीही लिहल्या. आंधळे शतक- मी भयंकराच्या दरवाजात उभा आहे हा निवडक कवितांचा संग्रह त्यांनी प्रसिद्ध केला. साहित्य आणि नाट्य क्षेत्रातील योगदानामुळे त्यांना 2004 मध्ये साहित्य जीवन गौरव पुरस्कार, बुद्ध रोहिदास विचार गौरव पुरस्कार मिळाला. भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊनही त्यांना गौरविले आहे.
ढसाळ यांच्याविषयी आणखी पुढे वाचा...