आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

धरणांतील पाणी पिण्यासाठीच; जुलैच्या प्रारंभी मराठवाड्यात पाऊस

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यात पावसाने दडी मारल्याने जवळपास सर्वच धरणांतील पाण्याचा साठा कमी होत चालला आहे. या काळात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता राज्यातील उपलब्ध पाण्याचा वापर प्राधान्याने फक्त पिण्यासाठीच करावा, अशी सूचना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी शुक्रवारी विभागीय आयुक्त व जिल्हाधिकार्‍यांना केली. तसेच मराठवाडा विभागाची यासाठी स्वतंत्र बैठक त्वरित घेण्यात यावी, असे निर्देशही त्यांनी औरंगाबादच्या विभागीय आयुक्तांना दिले.
व्हीसीमार्फत आढावा : राज्यातील पाणीपुरवठा आणि कमी होत चाललेल्या पाणीसाठ्याबाबत मुख्यमंत्र्यांनी आपल्या निवासस्थानातून नाशिक, औरंगाबाद व पुणे या तीन विभागीय आयुक्तांसह या तीन विभागांतील 20 जिल्हाधिकार्‍यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. टंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांचे प्रस्ताव जिल्हाधिकार्‍यांकडून आल्यास मुख्यमंत्री दुष्काळ सहायता निधीतून आवश्यक निधी तत्काळ दिला जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी या अधिकार्‍यांना सांगितले. दुष्काळी सहायता निधीतील दोन कोटी रुपयांपर्यंतचा खर्च करण्याची 30 जूनला संपणारी मुदतही मुख्यमंत्र्यांनी वाढवून दिली.
अनेक जिल्ह्यांत दुबार पेरणी व काही गावांना टँकर्सद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे आवश्यक आहे. चार्‍याचा प्रश्नही उद्भवू शकतो म्हणून प्रत्येक जिल्हाधिकार्‍यांनी स्वत:च्या जिल्ह्याचा आराखडा तयार करावा असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या वेळी मुख्य सचिव जे. एस. सहारिया, कृषी विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. सुधीरकुमार गोयल, वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीरकुमार श्रीवास्तव, लाभक्षेत्र विकास विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर आदी उपस्थित होते.