आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पुन्हा डान्सबार बंदीसाठी वटहुकूम काढू, आबांची घोषणा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारवरील बंदी उठवल्यानंतर सरकार पुन्हा डान्सबारबंदीचा वटहुकूम काढणार आहे, अशी घोषणा गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी शुक्रवारी विधानसभेत केली. या वटहुकुमात त्रुटी राहू नयेत, यासाठी त्याचा मसुदा महाधिवक्ता तयार करत असून दिल्लीतील ज्येष्ठ विधिज्ञांचा सल्ला घेत असल्याचे पाटील म्हणाले.


विरोधकांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेसंदर्भात उपस्थित केलेल्या अंतिम आठवडा प्रस्तावावरील चर्चेदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने डान्सबारबंदीचा निर्णय रद्दबातल ठरवल्यावरून सरकारला धारेवर धरले. त्यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, डान्सबार बंदीला बळकट वैधानिक अधिष्ठान लाभावे, यासाठी विधी व न्याय, कामगार, उत्पादनशुल्क व महसूल यासंदर्भातील कायदे परस्परपूरक करण्यात येतील. महाधिवक्त्यांनी मसुदा दिल्यानंतर व ज्येष्ठ विधिज्ञांचा सल्ला घेतल्यानंतर डान्सबारबंदीचा वटहुकूम लागू करण्यात येईल. डान्सबार बंदीसाठी जे जे आवश्यक असतील, ते ते करण्यात येईल. सरकारच्या निर्णयावरून पुन्हा टीका उद्भवू नये, यासाठी वटहुकूम काढण्यापूर्वी यासंदर्भात सर्व गटनेत्यांच्या बैठका घेण्यात येतील, असेही पाटील यांनी या वेळी सांगितले.
डान्सबारबंदीची मागणी विरोधकांनीच केली होती. राज्यातील तरुणाईचे नुकसान होऊ नये, या चांगल्या भावनेतूनच डान्सबारबंदीचा निर्णय घेण्यात आला होता. सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय टिकला नाही, यासंदर्भात मी दोष स्वीकारायला तयार असलो, तरी निर्णय चांगल्याच भावनेतून घेण्यात आला होता, असेदेखील पाटील यांनी विरोधकांना सुनावले.