आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यातील 101 चित्रपटगृहांत झळकला ‘दशक्रिया’ चित्रपट; राज्यभरात 65 टक्के बुकिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- ब्राह्मण व हिंदू परंपरांची बदनामी हाेत असल्याचा अाक्षेप घेत काही संघटनांनी तीव्र विराेध केल्यानंतरही ‘दशक्रिया’ हा मराठी चित्रपट मुंबर्इसह राज्यातील सर्वच शहरांत प्रदर्शित करण्यात अाला. तो सुमारे १०१ चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून त्याला सर्वत्र पहिल्याच दिवशी सुमारे ६० ते ६५ टक्के इतके बुकिंग मिळाल्याची माहिती वितरकांकडून देण्यात अाली.  

प्रख्यात साहित्यिक बाबा भांड यांच्या ‘दशक्रिया’ कादंबरीवर आधारित असलेल्या त्याच शीर्षकाच्या या चित्रपटामधून ब्राह्मणांची बदनामी केल्याचा आरोप अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने केला हाेता. तसे हा चित्रपट दाखवू नये, अशी मागणीही राज्यभरातील संघटनांनी केली हाेती. त्यावर या चित्रपटाचे सहनिर्माते नील कोठारी यांनी पोलिस महासंचालक सतीश माथूर यांना एक पत्र देऊन पोलिस संरक्षणाची मागणी केली होती. त्या पत्राची गांभीर्याने गृह खात्याने दखल घेऊन ‘दशक्रिया’ चित्रपट झळकलेल्या चित्रपटगृहांमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून योग्य ती खबरदारी घेतली.    


दशक्रिया हा चित्रपट राज्यातील सुमारे सव्वाशे चित्रपटगृहांत प्रदर्शित होणार होता, परंतु गेल्या काही दिवसांतील गदारोळामुळे हा चित्रपट आज १०१ चित्रपटगृहांत प्रदर्शित झाला आहे. मुंबई, ठाण्यामध्ये ४९ चित्रपटगृहांत दशक्रिया प्रदर्शित झाला असून या सर्वच ठिकाणी पहिल्या खेळापासून कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही. पाेलिसांनी दक्षता म्हणून मुंबई, ठाण्यासह प्रमुख शहरांतील चित्रपटगृहांबाहेर पोलिस तैनात ठेवले होते. दादरच्या प्लाझा चित्रपटगृहाच्या बाहेर चार पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. नाशिक शहरातील सिटी सेंटर मॉलमध्ये दुपारी अडीचच्या शोला चित्रपटगृहात खबरदारीचा उपाय म्हणून आज पोलिस हजर होते.   


चित्रपट पाहूनच मते मांडावीत-पाटील 

चित्रपटाचे पटकथाकार संजय कृष्णाजी पाटील यांनी सांगितले की,  दशक्रिया या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांनी प्रथम ही कलाकृती काय आहे हे समजून घ्यायला हवे होते. हा चित्रपट पाहून मग अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या आनंद दवे यांनी आमच्याशी चर्चा केली असती तर ते अधिक उत्तम झाले असते. कोणता चित्रपट प्रेक्षकांनी पाहावा, कोणता पाहू नये हे मत कोणीही कोणावर लादता कामा नयेत. प्रेक्षकांना काय ते ठरवू द्यावे. ज्या प्रेक्षकांनी चित्रपट पाहिला त्यांनी तो आवडल्याच्या प्रतिक्रिया पोहोचवलेल्या आहेत.   


वाद निरर्थक  - संदीप पाटील

या दिग्दर्शक संदीप पाटील यांनी सांगितले की, दशक्रिया हा चित्रपट सेन्सॉरने संमत केला होता. त्याला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे चित्रपट पुरस्कार मिळालेले आहेत. या चित्रपटाच्या विरोधात करण्यात आलेली याचिका न्यायालयाने फेटाळून लावली. 

 

कोकणात झळकला नाही   
कोकणात मात्र दशक्रिया हा चित्रपट निर्मात्यांनीच प्रदर्शित केलेला नाही. कणकवली येथील लक्ष्मी चित्र मंदिर व रत्नागिरी येथील सिटी प्राइड श्रीराम या चित्रपटगृहांमध्ये दशक्रिया प्रदर्शित करण्यास निर्मात्यांनीच नकार दिला हाेता.    

बातम्या आणखी आहेत...