मुंबई- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी खासदार दत्ता मेघेंनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना पत्र लिहून काँग्रेसमधील सर्व पदाचा व सदस्त्वाचा राजीनामा दिला आहे. काही काळापासून काँग्रेस पक्षात नाराज असलेले मेघे पिता-पुत्र भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. नितीन गडकरींच्या मध्यस्तीने मेघे भाजपाच्या कळपात जात आहे. याबाबत मेघे लवकरच घोषणा करणार आहेत.
भाजपमधील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मेघे हे जुलै महिन्यात भाजपात प्रवेश करतील. या दरम्यान काळात ते राज्यासह दिल्लीतील काही नेत्यांची भेट घेतील. वर्ध्याचे भाजपचे खासदार यांनीही मेघेंच्या भाजपला आनंदाने परवानगी दिली आहे. ते मूळचे मेघे यांचे कार्यकर्त्येच आहेत. त्यामुळे पक्षीय पातळीवर कोणताही संघर्ष असणार नाही. मेघे यांनी सक्रीय राजकारणातून निवृत्तीचे संकेत दिले आहेत. त्यामुळेच त्यांनी मुलाला पुढे केले आहे. सागर मेघे यांचा लोकसभेला दारूण पराभव झाला. मात्र, दत्ता मेघे हे आपले दोन्ही मुले सुधीर आणि सागर यांना राज्याच्या राजकारणात प्रस्थापित करू पाहत आहेत. त्यातच सध्या भाजपला अनुकुल वातावरण आहे.
मेघे आणि गडकरी यांच्यात अनेक वर्षापासून मैत्री आहे. त्यातच वेगळ्या विदर्भाचा मुद्दा भाजप व गडकरींनी छेडला आहे. त्यामुळे गडकरींनी आगामी 5-10 वर्षातील राजकारणाची दिशा ओळखून मेघेंना पक्षात प्रवेश करण्याबाबत चर्चा केली आहे. मेघेंची ओळख हे काँग्रेसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून राहिली आहे. काही काळ ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीतही राहिले मात्र पुन्हा काँग्रेसवासी झाले. आता पुन्हा एकदा ते भाजपाच्या कळपात जात आहेत.