आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Datta Padsalgikar To Succeed Mumbai CP Javed Ahmed Tomarrow

मुंबई पोलिस आयुक्तपदी दत्ता पडसलगीकर, आज स्वीकारणार पदभार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी ज्येष्ठ पोलिस अधिकारी दत्ता पडसलगीकर यांची वर्णी लागली असून, आज ते विद्यमान आयुक्त जावेद अहमद यांच्याकडून पदभार स्वीकारणार आहेत. जावेद अहमद उद्या सेवानिवृत्त होत आहेत. असे असले तरी जावेद यांची सोदी अरेबियात भारताच्या राजदूतपदी निवड झाली आहे. जावेद यांचा पोलिस आयुक्तपदाचा कार्यकाल 31 जानेवारी रोजी संपत आहे. मात्र, त्यादिवशी रविवार आल्याने शनिवारीच ते सेवानिवृत्त होत आहेत. त्यामुळेच शनिवारी दुपारीच जावेद यांच्याकडून पडसलगीकर आयुक्तपदाची सूत्रे हाती घेणार आहेत.
भारतीय पोलिस सेवेच्या 1982 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असलेले पडसलगीकर हे गेल्या अनेक वर्षांपासून केंद्रात प्रतिनियुक्तीवर होते. मागील पंधरवड्यात ते राज्यसेवेत दाखल झाले आहेत. राज्याने विनंती करताच त्यांना तातडीने तेथून मुक्त करण्यात आले. केंद्रीय गुप्तवार्ता (आयबी) विभागात अतिरिक्त संचालक म्हणून पडसलगीकर कार्यरत होते. यापूर्वी त्यांनी देश-विदेशात महत्त्वाच्या पदावर काम केले आहे. गुप्तचर विभागाचे प्रतिनिधी म्हणून अमेरिकेतही ते नियुक्तीला होते. मुंबई पोलिस दलातही त्यांना कामाचा अनुभव आहे. मुंबई पोलिस दलात त्यांनी अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.
मुंबई पोलिस आयुक्त म्हणून पडसलगीकर यांना 31 ऑगस्ट 2018 पर्यंत काम करण्याची संधी मिळू शकते. पडसलगीकर यांच्या नियुक्तीमुळे तब्बल 9 वर्षांनी मराठी व्यक्ती मुंबईच्या पोलिस आयुक्तपदी विराजमान होत आहे. याआधी वर्ष 2007 मध्ये डी. एन. जाधव हे मराठी पोलिस आयुक्त झाले होते. मूळचे सोलापूरचे असलेले पडसलगीकर प्रामाणिक व सचोटीचे अधिकारी म्हणून परिचित आहेत. मुख्यमंत्री फडणवीस हे पडसलगीकरांना आयबीतून महासंचालक पदावर घेण्यास यशस्वी ठरले आहेत. दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर पडसलगीकरांचा गुप्तचर खात्यातील अनुभव मुंबईसाठी फायदेशीर ठरणार आहे.