आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • David Headley Names Ishrat Jahan As Lashkar Terrorist Before Court

इशरत जहाँ हाेती ‘ताेयबा’ची अात्मघातकी अतिरेकी : हेडलीचा व्हीसीवर जबाब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चकमकीत मारण्यात आलेले चौघे. इन्सेट - इशरत - Divya Marathi
चकमकीत मारण्यात आलेले चौघे. इन्सेट - इशरत
मुंबई - २६/११ च्या मुंबई हल्ला कटात सहभागी दहशतवादी डेव्हिड हेडलीने गुरुवारी आपल्या जबाबात गुजरातेतील वादग्रस्त इशरत जहां चकमकीविषयी माहिती देताना इशरत ही "लष्कर-ए-तोयबा'ची आत्मघातकी बॉम्बर होती, असे सांगितले. गुजरात पोलिसांनी २००४ मध्ये या १९ वर्षीय तरुणीला तीन साथीदारांसह चकमकीत ठार केले होते. तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हत्येचा कट या चौघांनी आखला होता, असा गुजरात पोलिसांचा दावा होता.
अमेरिकेत अटकेत असलेल्या हेडलीची मुंबई हल्ल्याप्रकरणी व्हिसीद्वारे मुंबईतील विशेष न्यायालयात साक्ष सुरू आहे. बुधवारी तांत्रिक अडचणीमुळे जबाब नोंदवला गेला नव्हता. गुरुवारी तिसऱ्या दिवशी जबाबात हेडलीने इशरतविषयी महत्त्वाची माहिती दिली. हेडलीने सांगितले, २००८ मधील हल्ल्यानंतर माझी साजिद मीरची भेट झाली. तेव्हा त्याने असुरी आनंद व्यक्त केला होता. लाहोरचा व्यापारी हाजी अशरफ यालाही मी ओळखतो. लष्करला अार्थिक मदत तो करत होता. अल-कायदाच्या इलियास काश्मिरी याचीही एकदा माझी भेट झाली होती.
राणा, आयएसआयकडून मिळत होते पैसे : शिकागोचा तहव्वूर राणा आणि आयएसआयकडून मला नियमित पैसे मिळत होते. तेव्हा मुंबईत इमिग्रेशन कन्सलटंट म्हणून ऑफिस उघडायचे होते. तेव्हा हल्ल्यापूर्वी एकदा राणा पण मुंबईस आला होता. तो पकडला जाईल, अशी मला नेहमी भीती वाटत असे. म्हणून मी त्याला अमेरिकेत जाण्याचा सल्ला दिला होता. याच काळात भारतात येण्यापूर्वी आयएसआयचे मेजर इकबाल यांनी २५ हजार डॉलर्स मला दिले होते. साजिद मीरकडून ४० हजार पाकिस्तानी रुपये मिळाले हाते. याच वेळी अब्दुर रहेमान पाशा यानेही १८ हजार रुपये दिले होते, असे हेडलीने सांगितले आहे.
दहशतवाद्यांच्या मृत्यूचेही राजकारण
इशरत लष्कर-ए-तोयबाचा दहशतवादी होती हे सिद्ध झाले आहे. मोदींच्या हत्येचा तो कट होता. काँग्रेसने दहशतवाद्यांच्या मृत्यूचेही राजकारण केले. आता सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी माफी मागावी.
- श्रीकांत शर्मा, भाजपचे राष्ट्रीय सचिव

पाठिंबा देणाऱ्यांनी माफी मागावी
इशरतला पाठिंबा देणाऱ्यांनी आता जाहीर माफी मागावी. हेडलीने याआधी शिकागो येथे तिच्याबाबत हीच माहिती दिली होती. आता पुन्हा त्याने तेच सांगितले आहे. इशरतला काही जणांनी "झाशी की राणी' असे संबोधले होते. अशा लोकांनी आता माफी मागावी.
संजय राऊत, शिवसेना खासदार व प्रवक्ते
अमेरिकेतील तुरुंगातून तिसऱ्या दिवशीही अनेक गौप्यस्फोट
तोयबाचा कमांडर लख्वी याने हेडलीशी बोलताना दहशतवादी मुजम्मिल बट्टवर सोपवण्यात आलेल्या एका मोहिमेतील अपयशाचा उल्लेख केला होता. एक महिला दहशतवादी त्यात ठार झाली होती. हेडलीने जबाबात हे सांगितल्यावर सरकारी वकील अॅड. उज्ज्वल निकम यांनी त्याला खाेदून विचारले तेव्हा हेडलीने इशरतबद्दल माहिती दिली. हेडली म्हणाला, "पोलिस चकमकीत एक महिला दहशतवादी मारली गेली होती.' यावर निकम यांनी तीन नावे घेतली. यापैकी इशरत हेच ठार झालेल्या महिलेचे नाव होते, असे सांगून लष्कर-ए-तोयबामध्ये महिलांची वेगळी शाखा असल्याची माहिती हेडलीने दिली.

अबू काहफा देत होता रक्तपाताची सूचना
मुंबई हल्ल्याच्या वेळी अबू काहफाने हल्लेखोरांना प्रशिक्षण दिले होते. कराचीत ज्या ठिकाणाहून दहशतवाद्यांना भयंकर रक्तपात घडवण्याच्या सूचना दिल्या जात होत्या तिथे काहफा होता. साजिद मीर आणि काहफा हल्लेखोरांना क्षणोक्षणी सूचना देत होत. या दहा हल्लेखोरांत काहफाचा एक पुतण्याही होता, अशी माहिती हेडली याने दिली.

अक्षरधाम हल्ला ही बाबरीची प्रतिक्रिया...
अबु दुजना याच्यासोबत मी काश्मीरमध्ये लढण्यासाठी गेलो होतो. अक्षरधाम मंदिरावर हल्ला करण्याची एक योजना आखली असल्याची माहिती दुजनानेच तेव्हा मला दिली होती. बाबरी मशीद पाडल्याविरुद्ध (१९९२) एखाद्या भव्य अशा भारतीय मंदिरावर हल्ला करणे योग्यच आहे असे दुजनाचे मत होते, अशी माहिती पण हेडलीने दिली.

हेडलीमुळे राजकारणही तापले!
एखाद्या जबाबाच्या आधारे अहमदाबाद चकमक योग्य ठरू शकत नाही. सीबीआय तपासातही ही चकमक बनावट ठरली होती. अनेक पोलिस अधिकाऱ्यांना शिक्षाही झाली. आता मोदी सरकार हे सत्य दडवू पाहत आहे. - मनीष तिवारी, काँग्रेस नेते

हेडलीने दिलेले जबाब भारत सरकार, सुरक्षा संस्था व सरकारी पक्षासाठी यासंबंधीच्या सर्व खटल्यांत अत्यंत उपयुक्त ठरणारे आहेत. याबाबत भारतात झालेली चौकशी व कारवाई योग्य होती, हेच यातून दिसते. - किरण रिजिजू, केंद्रीय गृह राज्यमंत्री