आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dawood Ibrahim Just Slip Out From Indian Intelligence Agencies In August

...तर दाऊद आज भारताच्या ताब्यात असता! अभेद्य सुरक्षेमुळे बचावला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन आता भारत सरकारच्या ताब्यात आहे. आता सर्वांना प्रतिक्षा आहे दाऊद इब्राहिम याची. मात्र तीन महिन्यापूर्वी दाऊद भारतीय गुप्तहेरांच्या हाती सापडता सापडता बालबाल बचावला. ऑगस्ट महिन्यात भारतीय गुप्तहेर दाऊदपर्यंत पोहचले होते मात्र सुरक्षेचे मजबूत कवच असल्याने दाऊद बचावला अशी माहिती पुढे आली आहे. दाऊद युरोपच्या दौ-यावर असताना भारतीय गुप्तचर संघटनांनी हे ऑपरेशन राबविले, मात्र याची कुणकुण लागल्यामुळेच तेव्हापासून दाऊद कराची येथील क्लिफ्टन पार्क या आपल्या अतिसुरक्षित घरातून बाहेर पडलाच नाही अशी माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांतील सूत्रांनी दिली आहे.
विश्‍वसनीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील दाऊदचे नातेवाईक त्याच्या संपर्कात आहेत याची माहिती मिळाल्यानंतर भारतीय गुप्तचर संघटनांनी नातेवाईकांना लक्ष्य करून एक गुप्त ऑपरेशन हाती घेतले. हे ऑपरेशन सुरू असताना दाऊद युरोपमध्ये असल्याची माहिती मिळाली. या माहितीवरून भारतीय गुप्तहेरांनी दाऊदचा माग काढला. ते दाऊदपर्यंत पोहचलेही होते, मात्र पाकिस्तानी गुप्तहेर संघटना आयएसआयचे एजंट आणि सुरक्षारक्षक याचे त्याला असलेले भक्क्म कवच त्यांना भेदता आले नाही. भारतीय गुप्तहेर आपल्यापर्यंत पोहचले होते हे समजल्यानंतर दाऊद पुन्हा कराचीमधील घरातून बाहेर पडलाच नाही.
जगभरातील सर्व प्रमुख देशाच्या वॉण्टेड लिस्टमध्ये अग्रस्थानी असलेल्या दाऊदने बनावट पासपोर्टचा वापर करून अनेक देशांत भ्रमंती केल्याचे उघड झाले आहे. म्हणूनच भारतीय गुप्तचर संघटनांचे अधिकारी दाऊदला पाकिस्तानबाहेरच टार्गेट करण्याच्या प्रयत्नात होते.
44 हजार कोटींची संपत्ती, अनेक देशांत गुंतवणूक
दाऊद इब्राहिमने भारतात गुन्हेगारी जगतातून प्रचंड पैसा कमविला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, दाऊदची संपत्ती 44 हजार कोटींच्या घरात आहे. दाऊदने आपला कोट्यवधीचा काळा पैसा भारतासह, पाकिस्तान आणि दुबईमधील बांधकाम व्यवसायात गुंतविला आहे. इतकेच नाही तर कराची आणि मुंबईच्या शेअर बाजारात अनेक कंपन्यांच्या नावे दाऊदची गुंतवणूक असल्याचे समजते. तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थ तयार करून विकण्याचाही त्याचा व्यवसाय आहे. पाकिस्तानातील कपड्याच्या गिरण्यांवर दाऊदचे वर्चस्व आहे. मुंबईतील गिरण्या एकापाठोपाठ एक बंद झाल्यावर यातील मशीन्स आणि इतर साहित्य भंगारात काढण्यात आले, मात्र भंगार माफियांना हाताशी घेऊन दाऊदने या मशीन्स आणि साहित्य पाकिस्तानात नेल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.