आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंडरवर्ल्ड डाॅन दाऊद भाच्याच्या लग्नाला लावणार स्काइपद्वारे हजेरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दाऊद आणि हसिना पारकर. - Divya Marathi
दाऊद आणि हसिना पारकर.
मुंबई - कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाचा अलीशाह पारकर याचा लग्नसोहळा बुधवारी पार पडणार असून या सोहळ्याला दाऊद स्काइपद्वारे हजेरी लावणार असल्याचे समजते. अलीशाह हा दाऊदची बहीण हसीना पारकरचा लहान मुलगा असून त्याच्या विवाह सोहळ्याला गुन्हेगारी जगतातील अनेक जण हजेरी लावण्याची शक्यता वर्तावण्यात येत आहे. त्यामुळे या विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पोलिस यंत्रणा सतर्क झाली आहे.

मुंबईत बांधकाम व्यावसायिक असलेल्या अलीशाहचा विवाह मेमन समाजातील एक बडे प्रस्थ असलेल्या उद्योगपती सिराज अली मोहंमद नागानी यांच्या मुलीशी म्हणजेच आयेशा नागानी हिच्याशी होणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी सकाळी अलीशाह राहत असलेल्या नागपाडा येथील रसूल मशिदीत निकाहचे विधी पार पडणार असून रात्री नऊ वाजता मुंबईतील जुहू परिसरातील ट्युलीप स्टार या पंचतारांकित हॉटेलमध्ये स्वागत समारंभ पार पडणार आहे. अलीशाह हा हसीना पारकर हिचा सर्वात लहान मुलगा असून त्याची मोठी बहिण हुमैरा हिचा गेल्या वर्षीच विवाह पार पडला होता. तर २००६ साली हसीना पारकरचा मोठा मुलगा दानिशचा मोटार अपघातात मृत्यू झाला होता. हसीना पारकर हिचा २०१४ साली हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता.

मुंबई पोलिसांचे खंडणी विरोधी पथक आणि पोलिसांच्या विशेष पथकाचे अधिकारी साध्या वेषात लग्न समारंभावर लक्ष ठेवून असणार आहेत. दाऊद टोळीचे कोण कोण या समारंभाला हजर राहणार यासह विरोधी टोळ्यांच्या कारवायांवरही पोलिसांचे लक्ष असणार असल्याची माहिती पोलिस विभागातील सूत्रांनी दिली.

इक्बालसह कुटुंबीयही
दाऊदच्या परिवारातील सदस्यांपैकी सर्वात लहान भाऊ इक्बाल कासकर आणि त्यांच्या दोन बहिणी आपल्या परिवारासह या विवाह समारंभाला हजर राहतील, असा अंदाज आहे. तर दाऊद मात्र या विवाह सोहळ्याला स्काइपच्या माध्यमातून हजेरी लावेल, अशी माहिती पोलिस विभागाला प्राप्त झाली आहे.

शाही स्वागत समारंभ
ट्युलीप स्टार हॉटेलच्या अतिभव्य अशा हार्बर हॉलमध्ये हा स्वागत समारंभ पार पडणार आहे. या हॉलची क्षमता आठशे लोकांची असून मुंबईतील दिल्ली दरबार या प्रसिद्ध हॉटेल समूहाकडे या समारंभातील मेजवानीची व्यवस्था देण्यात आली आहे. या मेजवानीमध्ये मोगलाई दम बिर्यानी, बटर चिकन, जिलेबीसह कबाब आणि इतर पदार्थांची रेलचेल असणार आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कुणासोबत होणार अलीशाहचा निकाह, मुंबईत कुठे आहे निकाहस्‍थळ... कोण - कोण येणार