आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई/ठाणे - ठाण्याजवळ शिळफाटा परिसरात अनधिकृत इमारत दुर्घटनेतील मृतांची संख्या शनिवारी 72 झाली. तर 60 जणांना ढिगार्याखालून सुखरूप बाहेर काढण्यात अग्निशामक दलास यश आले. 36 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, दुर्घटनेस जबाबदार बिल्डर सलील आणि खलील जमादार यांच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंदवण्यात आला असून सलील याला पोलिसांनी अटक केली. ठाणे महापालिकेचे उपायुक्त दीपक चव्हाण तसेच एका पोलिस निरीक्षकाला निलंबित करण्यात आले आहे.
शिळफाटा येथे जमादार यांच्या अनधिकृत ‘लकी’ या सातमजली इमारतीचे बांधकाम अवघ्या दोन महिन्यांत पूर्ण करण्यात आले होते. इमारतीचा विद्युत आणि पाणीपुरवठा तोडला जाऊ नये म्हणून बिल्डरने काही लोकांना सदनिकेत बळजबरी आणून ठेवले होते. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता ही इमारत कोसळली.
सायंकाळी इमारतीच्या कामासाठी आलेले मजूर घरी निघाले होते. मात्र, येथील कंत्राटदाराने धमकी देऊन विटा उतरवण्यास सांगितल्या. याच वेळी इमारत कोसळली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शीने दिली. मनसे आमदार रमेश पाटील यांनी इमारतीची तक्रार केली होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले.
दोन लाखांची मदत
मृतांच्या नातेवाईकांना दोन लाख तर जखमींना प्रत्येकी 50 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह रुग्णालयात जखमींची विचारपूस केली.
महापालिका उपायुक्त, पोलिस निरीक्षक निलंबित
ठाणे महापालिकेचे उपायुक्त दीपक चव्हाण आणि या भागातील पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक किशोर नाईक यांना निलंबित करण्यात आले. वन विभागाच्या जमिनीवर ही इमारत उभारली जात होती, याचे पुरावे असल्याने त्या विभागाच्या अधिकार्यांवरही कारवाई करण्याचे संकेत मुख्यमंत्र्यांनी दिले.
त्याचे 13 आप्त गेले...
‘हमारे तो सभी लोग चले गये; माँ, बाप, भाई, बहन और बीवी भी... आपको तो मालूम है, बीवी पेट से थी...’ अशी मदतीची आर्त हाक इम्रान सिद्दिकी मुख्यमंत्र्यांना देत होता. त्याच्या कुटुंबातील 13 व्यक्ती दगावल्या.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.