मुंबई - आदर्श घोटाळ्याचा चौकशी अहवाल फेटाळण्याचा निर्णय मंत्रिमंडळाचा नव्हे, तर मुख्यमंत्र्यांचाच होता, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर सडकून हल्ला चढवला. अहवाल फेटाळल्याचे दु:ख वाटत असेल तर मुख्यमंत्र्यांनी त्यावर फेरविचार करावा. राष्ट्रवादीचा काहीही अडथळा नाही, असे म्हणत राष्ट्रवादीने चव्हाणांना कोंडीत पकडले.
राष्ट्रवादी कार्यालयात जनता दरबारासाठी अजित पवार आले होते. त्यानंतर पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन पवार यांचीच री ओढली. राष्ट्रवादीचे तत्कालीन राज्यमंत्री सुनील तटकरे व राजेश टोपे यांनी अधिकार नसताना बैठका घेतल्याचा ठपका अहवालात आहे. त्यावर मुख्यमंत्री खूप व्यग्र असतात. सभागृहात उत्तरे देण्यासाठी आणि बैठका घेण्याबाबत राज्यमंत्र्यांना सूचना दिल्या जातात. मात्र निर्णय मुख्यमंत्र्यांचाच असतो. त्यामुळे राष्ट्रवादी मंत्र्यांनी बैठका घेतल्या असतील, तर त्यात गैर काहीच नाही, अशी मखलाशीही त्यांनी केली.