आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तांत्रिक अधिका-यांनाही अति.आयुक्तपद, औरंगाबाद, नाशिकसाठी आठ वाढीव पद मंजूर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- औरंगाबाद, नाशिकसह राज्यातील 8 महानगरपालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्तांचे प्रत्येकी एक वाढीव पद मंजूर करण्याचा निर्णय राज्य सरकारने मंगळवारी घेतला आहे. यामुळे या दोन्ही महापालिकांमध्ये आता अतिरिक्त आयुक्तांची एकूण ३ पदे निर्माण होणार आहेत. या पदावर नियुक्तीसाठी आजवर महापालिकेच्या तांत्रिक व लेखा शाखेचा अनुभव असणा-यांना अपात्र मानले जात होते. आता मात्र त्यांनाही या नियुक्तीसाठी पात्र मानण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही सरकारने घेतला आहे.
"अ', "ब' आणि क वर्ग महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त पदावर त्या-त्या महापालिकेतील उपायुक्त वा समकक्ष पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांमधून अत्युत्कृष्ट गुणवत्ता व क्षमता या निकषानुसार निवडीने नियुक्ती करणे शासनास उचित वाटते. त्यामुळे या महापालिकेतील अतिरिक्त आयुक्त पदावर महापालिकेतील अधिकाऱ्यांमधून निवडीने नियुक्ती करताना महानगरपालिकेच्या तांत्रिक व लेखा सेवेतील समकक्ष अधिकाऱ्यांचाही विचार करण्यात यावा, असा शासनादेश राज्य सरकारने जारी केला आहे.
या पदावर निवडीसाठी उपायुक्त वा समकक्ष पदाचा किमान १० वर्षांचा अनुभव, मनपाच्यासेवेत स्थायीकरण, १० पैकी किमान ९ गोपनीय अहवाल अत्यत्कृष्ट दर्जाचे असावे आणि ही पात्रता धारण करणाऱ्या ५ अधिकाऱ्यांची नावे एका पदासाठी राज्य सरकारकडे सूचविण्यात यावे. विभागीय चौकशी, दक्षता, वा फौजदारी कार्यवाही सुरू असलेल्यांची नावे यासाठी सूचवू नयेत, असेही शासनाने म्हटले आहे. प्रधान सचिव, नगर विकास-२ यांच्या नेतृत्वाखालील एक समिती सूचविण्यात आलेल्या अधिकाऱ्यांच्या नावांची छाननी करून शासनास शिफारस करेल, असेही सरकारने स्पष्ट केले आहे.
महानगरपालिका प्रशासनाला बळकट करण्यासाठी अतिरिक्त आयुक्तांची एक किंवा अधिक पदे निर्माण करण्याचा व त्या पदांवर सुयोग्य व्यक्तीची निवड करण्याचा अधिकार राज्य शासनाला आहे. गेल्या वर्षी १ सप्टेंबर रोजी घेतलेल्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने महापालिकांचे सुधारित वर्गीकरण केले होते. त्यानुसार क श्रेणीत असलेल्या नाशिक मनपाला ब श्रेणी तर ड श्रेणीतील औरंगाबाद मनपास क श्रेणी बहाल करण्यात आली होती. श्रेणीवाढ करतानाच या दोन्ही महापालिकांमध्ये अतिरिक्त आयुक्तांची पदे प्रत्येकी दोनने वाढविण्यात आली होती. नाशिक मनपातील या दोन अतिरिक्त आयुक्तांपैकी १ पद राज्य शासनाच्या सेवेतील अधिका-यांमधून प्रतिनियुक्तीने तर दुसरे पद त्या-त्या महापालिकेत कार्यरत अधिकाऱ्यांमधून भरण्याचा निर्मय राज्य सरकारने घेतला होता.