आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नैराश्यामुळे वाढल्या आत्महत्या, अभिनेत्री दीपिका पदुकोनचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘जगात फक्त आपल्या देशातच नैराश्याने ग्रासलेल्या व्यक्ती मोठ्या प्रमाणावर असून त्यामुळेच आत्महत्यांचेही प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे नैराश्यावर मात करणे व निराश झालेल्यांचे मनोबल वाढवण्याची अत्यंत आवश्यकता अाहे,’ असे मत बाॅलीवूडची प्रख्यात अभिनेत्री दीपिका पदुकोनने खास ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केले.

समाजात काय चालले आहे याचे कलाकारांना घेणे- देणे नसते असे म्हटले जाते. परंतु काही कलाकार समाजभान ठेवून काम करतात. नाना पाटेकर व मकरंद अनासपुरे यांनी ‘नाम’ संस्थेची स्थापना करून दुष्काळग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. अशाच प्रकारे दीपिका पदुकोननेही ‘लिव्ह लव्ह लाइफ’ नावाची संस्था स्थापन करून नैराश्यग्रस्तांचे मनोबल वाढवण्याचे काम सुरू केले आहे. दैनिक भास्कर व दैनिक दिव्य मराठीच्या सार्थक दिवाळी अभियानातही दीपिका सामील झाली होती. दिवाळीमध्ये गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्यासाठी दैनिक भास्कर वृत्तपत्र समूहाने केलेल्या प्रयत्नास दीपिकाने साथ दिलेली अाहे.

‘लिव्ह लव्ह लाइफ’ची स्थापना का करावीशी वाटली असे विचारता दीपिकाने सांगितले, ‘माझ्या स्वतःच्या आयुष्यात अशी एक घटना घडली होती. त्यामुळे मला नैराश्यामुळे काय होते आणि त्याचे काय परिणाम भोगावे लागतात याची जाणीव झाली. देशात नैराश्याने असे अनेक त्रस्त आहेत. दुष्काळग्रस्त भागात आत्महत्या याच कारणामुळे होत आहेत. अशा व्यक्तींना पुन्हा उभे करण्यासाठी काही तरी करावे असे मला वाटले आणि म्हणूनच मी या संस्थेची स्थापना केली.
मला उगीचच काहीतरी करायचे आणि प्रसिद्धीत राहायचे असे करायचे नव्हते. मला मनापासून खरोखर काहीतरी करायचे होते म्हणून मी संस्था स्थापन करून काम सुरू केले आहे. चित्रपटांमधूनही असाच सकारात्मक संदेश आम्ही देत असतो. इम्तियाज अली दिग्दर्शित माझ्या आगामी ‘तमाशा’ चित्रपटात आम्ही असाच संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

आई-वडील आपल्या मुलांवर अभ्यासाचे ओझे टाकतात आणि त्यामुळे त्याच्या मनातील इच्छा सुप्तच राहते. तसे न करता त्याला त्याच्या कलाने काम करू द्यावे,’ असे या चित्रपटात वेगळ्या पद्धतीने आम्ही दाखवले आहे.

सांगेन कधीतरी....!
‘नैराश्येच्या गर्तेत ढकलणारी अशी काेणती घटना तुझ्या आयुष्यात घडली हाेती?’ या प्रश्नावर दीपिका म्हणाली, ‘त्याबाबतीत मी नंतर कधी तरी सांगेन. प्रत्येकाच्या आय़ुष्यात काहीतरी घडते आणि त्याचे आयुष्य बदलते. मात्र त्याकडे सकारात्मकतेने पाहाण्याची गरज आहे.’