आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Defame Poster Of BJP Before Shiv Sena Bhavan, After Discussion Sena Defend

शिवसेना भवनासमोर भाजपवर टीका करणारे पोस्टर्स, चर्चा झाल्यानंतर सेनेची सारवासारव

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - सत्तेवर आल्यापासूनच धुसफुसत असलेल्या शिवसेना-भाजपमधील संबंध गेल्या काही दिवसांत फारच ताणले गेले आहेत. त्यातच गुरुवारी दसरा मेळाव्यात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे भाजपवर शरसंधान करण्यापूर्वीच बुधवारी सकाळी शिवसैनिकांनी भाजपवर टीका करणारे काही स्टर्स झळकावल्याने हा वाद आणखीच चिघळण्याची चिन्हे निर्माण झाली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांना ‘गर्विष्ठ’ संबोधून बाळासाहेबांसमोर मान झुकवत असल्याचे पोस्टर शिवसैनिकांनी लावले आणि एकच चर्चा सुरू झाली. नंतर मात्र हे पोस्टर शिवसेनेची अधिकृत भूमिका नसून नाराज शिवसैनिकांनी पोस्टर लावल्याचे स्पष्टीकरण देत शिवसेनेकडून लगेचच सारवासारव करण्यात आली. एकूणच पोस्टर प्रकरण अंगाशी येणार असे दिसताच शिवसेनेने माघार घेतल्याचे म्हटले जाते.

बुधवारी मुंबईत शिवसेना भवनच्या समोर घाटकोपरच्या शिवसैनिकांनी एक भले मोठे पोस्टर लावले होते. या पोस्टरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी, मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यासह भाजप नेते अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी हे बाळासाहेबांबरोबर चर्चा करताना दाखवण्यात आले होते. नरेंद्र मोदी नतमस्तक होऊन बाळासाहेबांना अभिवादन करतानाचा मोठा फोटो होता. या फोटोसोबत ‘झुकल्या होत्या यांच्या गर्विष्ठ माना’ असा उल्लेख केला होता. एकूणच या सर्व नेत्यांना ‘गर्विष्ठ’ म्हणण्यात आले होते. शिवाजी पार्कसह घाटकोपर, अंधेरी येथेही असे पोस्टर्स लावण्यात आले होते.

या पोस्टर्सची माहिती मिळताच पोलिस आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ते हटवण्यास सुरुवात केली. पालिकेची परवानगी न घेता हे पोस्टर्स लावण्यात आल्याचे कारण त्यासाठी देण्यात आले. मात्र, शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांकडून आल्या आदेशानंतरच ही कारवाई करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. दरम्यान, आधी निवडणुकीत युती करताना व नंतर सत्तेत घेतल्यानंतरही शिवसेनेला पदोपदी अपमानित करणाऱ्या भाजप नेत्यांना त्यांची जागा दाखवण्यासाठी पोस्टर्स लावण्यात आल्याचे एका शिवसैनिकाने सांगितले.

भाजपचा पलटवार
शिवसेनेच्या या पोस्टर्सना भाजप नेत्यांनीही चोख प्रत्युत्तर दिले आहे. ‘उद्या आदित्य ठाकरेही पंतप्रधानांसमोर झुकल्याचे पोस्टर्स लागले तर आश्चर्य वाटायला नको,’ असा इशारा शिवसेनेला दिला आहे. दरम्यान, सत्तेत असताना भाजपच्या नेत्यांना गर्विष्ठ म्हणण्याचा परिणाम होईल हे लक्षात येताच शिवसेना नेत्यांनी लगेचच ही पक्षाची भूमिका नाही. नाराज शिवसैनिकांनी पोस्टर्स लावले असून हा विषय बंद करावा, असा संदेश पत्रकारांना पाठवला आणि वादातून माघार घेतली.