मुंबई - विधानसभा निवडणुकीचे वेध लागले तसे भाजपमध्येही ‘स्वबळाची’ भाषा सुरू झाली आहे. गुरुवारी पक्षाच्या अंधेरी येथे पार पडलेल्या पदाधिकार्यांच्या मेळाव्यात अनेक नेत्यांनी शिवसेनेबरोबर फरपटत जाण्यापेक्षा स्वबळावर ताकद आजमावण्याची भाषा केली. यात ज्येष्ठ नेते मधु चव्हाण यांनी तर भाजपसोबत तीन पायांची शर्यत थांबवण्याची सूचना केली आणि त्यांना इतर तीन नेत्यांनी पाठबळ दिले.
अंधेरीतील शहाजी राजे क्रीडा संकुलातील या मेळाव्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रूडी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस आदी उपस्थित होते. माजी आमदार व ज्येष्ठ पदाधिकारी मधु चव्हाण मेळाव्यात म्हणाले, ‘भाजपला शिवसेनेबरोबर तीन पायांच्या शर्यतीचा आता कंटाळा आला आहे.
वर्षोनुवर्षे त्यांच्यामागे फरफटत जाण्यापेक्षा स्वबळावर गेल्यास पक्षाची ताकद तरी समजेल. आणखी किती वर्षे शिवसेनेच्या वृक्षाखाली बोनसाय होऊन राहायचे?’ हाच सूर वरच्या टिपेला नेताना आणखी तीन पदाधिकार्यांनी स्वबळावर निवडणूक लढवण्याची मागणी केली.
जास्त जागांमुळे गणित चुकते
शिवसेनेबरोबर युती असल्याने मुंबई महापालिकेत आमचा कधीच महापौर होऊ शकत नाही. कारण, जास्त जागा घेऊन ते निवडून येतात. विधानसभेतही त्यांच्या जागा जास्त असल्याने तेच मुख्यमंत्रिपदावर दावा करणार. यामुळे आणखी कितीकाळ सेनेबरोबर आपण जायचे, हे ठरवायला हवे. भाजपच्या सध्याच्या ताकदीचा विचार करता 145 आणि अधिक जागा आपण जिंकू शकतो. मात्र शिवसेना आपल्याला इतक्या जागा देणार आहे का, याचे उत्तर नाही हेच येते. मग त्यांच्या मागे जाण्यात काही अर्थ नाही, अशी भावना मधु चव्हाण यांनी व्यक्त केली.
एक पक्ष, एक अजेंडा : ठाकूर
सूरजसिंग ठाकूर यांनी भाजपने एक पक्ष एक अजेंडा हेच लक्ष्य ठेवायला हवे, असे सूत्र मांडले. सेना 171 व भाजप 117 हे जागावाटप अन्यायकारक असून भागीदारीचा मोठा वाटा कायम सेनेला मिळत आला आहे. हे यापुढे चालवून घेता कामा नये, अशी सूचना मांडली.
मोठय़ा भावाचा त्रास किती दिवस : वर्षा भोसले
महिला संघटक वर्षा भोसले यांनी सेनेचा दबाव आणखी किती काळ सहन करायचा, याचा पक्षाच्या धुरिणांनी विचार करण्याची वेळ आली आहे, असे सांगितले. मोठय़ा भावाचा त्रास छोट्यांनी वर्षोनुवर्षे का सहन करायचा, असेही त्या म्हणाल्या.
जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा डाव
पदाधिकार्यांच्या तोंडून युती तोडण्याची भाषा करायची आणि वर सबुरीचा सल्ला द्यायचा, ही भाजप नेत्यांची भाषा म्हणजे 288 पैकी निम्म्या 148 जागा पदरात पाडून घेण्याचे डावपेच असल्याचे बोलले जाते. पाच वर्षांपूर्वी शिवसेना ज्या ठिकाणी तिसर्या किंवा चौथ्या क्रमांकावर राहिली, अशा किमान 35 ते 40 जागा भाजपला पदरात पाडून घ्यायच्या आहेत.
युती भक्कम : संजय राऊत
भाजपच्या स्वबळाच्या भाषेमुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडणे अपेक्षित होते. मात्र, शिवसेनेचे खासदार व प्रवक्ते संजय राऊत म्हणाले, ‘अशा छोट्या-मोठय़ा पदाधिकार्यांच्या बोलण्याने युती तुटणार नाही. ती भक्कमच आहे. या बोलण्यांकडे आम्ही लक्ष देत नाही.’
(फोटो - संग्रहित छायाचित्र)