आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Deokar's Bail Cancelled, Ncp Seeks His Resignation

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुलाबराव देवकरांचा राजीनामा; राष्ट्रवादी संभ्रमात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - जळगाव घरकुल घोटाळ्यातील आरोपी व राज्य परिवहनमंत्री गुलाबराव देवकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांकडे आपला राजीनामा पाठवूनही पक्षाने तो अद्याप स्वीकारला नसल्याने पक्षाच्या भूमिकेबाबत राजकीय वतरुळात टीका होत आहे. आधी देवकरांना राजकीय संरक्षण देऊन त्यांच्या पाठीशी उभ्या राहिलेल्या पक्षाने उच्च न्यायालयाच्या निकालानंतर मात्र त्यांच्या मागचा पाठिंबा काढून घेत राजीनामा मागितला खरा, पण स्वीकारला नाही. त्यामुळे आधी स्पष्ट भूमिका घेऊन देवकरांना संरक्षण देणार्‍या राष्ट्रवादीपुढे आता काय भूमिका घ्यायची असा पेच निर्माण झाला आहे का, असा सवाल पक्षातूनच विचारला जात आहे.
देवकर यांनी आपल्याकडे राजीनामा पाठवला असल्याचे प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड यांनी आज स्पष्ट केले. मात्र आपण त्यांचा राजीनामा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठवल्याचे पिचड यांनी सांगितले. दरम्यान, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना देवकर यांच्या राजीनाम्याबद्दल विचारले असता राष्ट्रवादीकडून आपल्याकडे तशी कोणतीच माहिती आलेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच अजित पवार यांनी त्यांचा राजीनामा उशिरापर्यंत स्वीकारला नव्हता. त्यामुळे देवकर हे अद्याप मंत्री आहेत की त्यांना मंत्रिपदावरून दूर करण्यात आले आहे याबाबत संदिग्धता कायम आहे. याआधी मे महिन्यामध्ये देवकर यांचे नाव घरकुल घोटाळ्यामध्ये आरोपी म्हणून पुढे आल्यानंतर त्यांनी राजीनामा पाठवून दिला होता. पण तेव्हाही पक्षाकडून तो स्वीकारण्यात आला नव्हता. देवकर यांनी त्याविरोधात उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस देवकर यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचे दिसून आले. त्यानंतर मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने त्यांचा जामीन फेटाळल्यावर मात्र देवकरांच्या पाठीशी उभा असणारा पक्षाने अचानक त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यामुळे आता देवकर यांचे मंत्रीपद जाईल हे निश्चित झाले होते. पिचड यांनी स्वत: देवकरांशी बातचित करून त्यांना राजीनामा देण्याचा आदेश दिला.
त्याप्रमाणे देवकरांनी पिचड यांच्याकडे राजीनामा पाठवला. पिचड यांनी तो अजित पवारांना दिला. मात्र अजित पवारांनी तो स्वीकारला नाही. दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने देवकर यांच्या अटकेला स्थगिती दिली. त्यामुळे त्यांचा राजीनामा स्वीकारायचा की नाही, अशा द्विधा मनस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्ष सापडलेला दिसतो. तसेच देवकर यांच्या मागेच उभे रहायचे असते तर राजीनामा मागण्याची गरजही नव्हती. या प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत राष्ट्रवादीने त्यांना पाठिंबा द्यायला हवा होता. मात्र प्रत्यक्षात तसे घडले नाही. त्यामुळे देवकरांच्या मंत्रीपदाबद्दल प्रश्नचिन्हं अद्याप कायम आहे.