मुंबई - मुंबई उच्च न्यायालयाने रुग्णालयांना उपचार खर्चाविषयी निर्देश दिले आहेत. उपचार सुरू करण्यापूर्वी रुग्णाला खर्चाविषयी माहिती द्यावी किंवा रुग्णालयांनी नोटीस बोर्डवर तसे दरपत्रक लावावे. उपचार झाल्यावर रुग्णालयाचे बिल चुकते न केलेल्या रुग्णांना तिथेच थांबवून घेतले जाते. असे प्रकार टाळण्यासाठी उपचार खर्चाची स्पष्ट पूर्वकल्पना रुग्णाला देण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.
अंधेरी येथील सेव्हन हिल्स हॉस्पिटल व पनवेल येथील प्राचीन हेल्थकेअर मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलविरुद्ध दाखल केलेल्या दोन याचिकांवरील सुनावणीच्या वेळी उच्च न्यायालयाने हे निर्देश दिले. रुग्णांनी आपल्याला डांबून ठेवल्याचा आरोप या दोन्ही रुग्णालयांवर केला होता. या दोन्ही याचिकांची जनहित याचिका समजून सुनावणी करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे.
न्यायमूर्ती व्ही.एम. कानडे व पी.डी. कोदे यांच्या पीठाने हे निर्देश जारी केले आहेत. रुग्णाला उपचार खर्चाविषयी आधीच माहिती दिल्यास उपचार घेण्या- न घेण्याचा निर्णय तो घेऊ शकतो. उपलब्ध पर्याय शोधण्यास यामुळे रुग्णाला मदत होईल, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
(फोटो - संग्रहित छायाचित्र)