आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadanvis Hits Back At Sharad Pawar Over Remarks About Narendra Modi

काही नवरे बाशिंग बांधून थकले, देवेंद्र फडणवीसांचा शरद पवारांना टोला

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय जनता पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आणि गुजरातचे मुख्‍यमंत्री नरेंद्र यांच्‍यावर टीका करणारे राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे अध्‍यक्ष शरद पवार यांना भाजपचे प्रदेशाध्‍यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्‍युत्तर दिले आहे. काही जण अनेक वर्षांपासून गुडघ्‍याला बाशिंग बांधून बसले आहेत. अजुनही त्‍यांना पंतप्रधानपदाचे स्‍वप्‍न पडत आहे, अशा शब्‍दात फडणवीस यांनी पवार यांना टोला लगावला.

देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवरुन पवारांच्‍या टीकेवर नाव न घेता प्रत्‍युत्तर दिले. ते म्‍हणाले, केवळ 7-8 खासदार असलेल्‍या पक्षाचे नेते पंतप्रधान व्‍हायचे स्‍वप्‍न पाहत आहेत. अनेक वर्षांपासून ते गुडघ्‍याला बाशिंग बांधून बसले आहेत. काही नवरे बाशिंग बांधून थकले आहेत. त्यामुळे दुसऱ्यांचे लग्न होत असल्‍याचे त्‍यांना पाहावत नाही, अशी टीका फडणवीस यांनी केली.

शनिवारी एका कार्यक्रमात पवार यांनी मोदींवर नाव न घेता टीका केली होती. 'उतावळा नवरा आणि गुडघ्‍याला बाशिंग', अशा शब्‍दात पवारांनी मोदींना टोला लगावला होता. पवार म्‍हणाले होते, निवडणुका वर्षभर लांब आहेत, अजून कशात काही नाही. तरीही काही जणांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडू लागली आहेत. पंतप्रधानपदाचे स्‍वप्‍न पूर्ण करण्‍यासाठी लोकसभेत आवश्‍यक जागा जिंकणे गरजेचे आहे. त्‍या मिळविता येणे शक्‍य नसल्‍याचे जाणवल्‍यानंतर काही जण देशात जातीय दंगली पसरविण्‍याचे काम करत आहेत. मुजफ्फरनगरमध्ये जातीय दंगली घडवून कोणाला पंतप्रधान व्हायची स्वप्ने पडत असतील तर ती जनता खरी होऊ देणार नाहीत, असा दावाही पवारांनी केला. धर्मनिरपेक्ष शक्तींनी अशांविरुद्ध एकत्र येण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केले.