आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Devendra Fadanvis Likely To Become Bjp Maharashtra Unit Chief

भाजप प्रदेशाध्यक्षपदाची शर्यत: फडणविसांचे पारडे जड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- भाजप प्रदेशाध्यक्ष निवडण्यासाठी बुधवारी दिल्लीत वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतही अद्याप निर्णय झाला नाही. विधान परिषद विरोधी पक्षनेते विनोद तावडे व विदर्भातील आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यापैकी एकाचे नाव दोन दिवसांत घोषित होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यातही ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे व माजी पक्षाध्यक्ष नितीन गडकरी या दोन्ही गटांची फडणवीस यांच्या नावाला पसंती मिळण्याची चिन्हे असल्याने त्यांच्याच गळ्यात प्रदेशाध्यक्षपदाची माळ पडण्याची शक्यता अधिक असल्याचे पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सांगितले.

विद्यमान प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांना पुन्हा या पदावर बसवण्याला भाजपचे वरिष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांनी विरोध केल्यामुळे विविध नावे चर्चेत होती. मुंडे यांनाही प्रदेशाध्यक्षपदामध्ये रस असल्याचे पक्षातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. मुनगंटीवार हे गडकरींचे निष्ठावान म्हणून ओळखले जातात. त्यांचा कार्यकाळ संपल्यामुळे आता दुसºया नेत्याला संधी द्यावी या मागणीसाठी मुंडे आग्रही आहेत, तर नितीन गडकरी गटाकडूनही मुनगंटीवारांनाच कायम ठेवण्यासाठी हालचाही करण्यात आल्या.

मुनगंटीवार नाही तर मुंडेही नकोत!
मुळात मुंडे यांनाही या पदासाठी रस होता. लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जवळ आल्या असताना राज्यातील पक्षाच्या नाड्या हातात ठेवणे ही मोठी गोष्ट असल्याने मुंडे यांच्याकडूनही खटपट होत होती. तसेच मुनगंटीवार यांच्या नावावर गडकरी गटाचे पारडे जड होत आहे असे वाटत असतानाच मुंडे यांनी दिल्लीमध्ये वरिष्ठ नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. पक्ष सोडण्याची धमकीही त्यांनी दिल्याचे समजते. त्यामुळे मुनगंटीवार यांनी स्वत:हूनच या स्पर्धेतून माघार घेतली. मुनगंटीवार यांना पुन्हा संधी मिळणार नसेल तर मुंडेंनाही मिळता कामा नये, अशी भूमिका गडकरी समर्थकांनी घेतल्यामुळे मुंडेंची इच्छा पूर्ण होणे सध्या तरी कठीण असल्याचे बोलले जाते. तावडे यांच्याही नावाला मुंडेंचा कडाडून विरोध आहे.

फडणवीस यांच्या नावाला मुंडे-गडकरींची मान्यता
भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी सुरुवातीपासूनच मुनगंटीवार, फडणवीस, तावडे, रावसाहेब दानवे यांची नावे चर्चेत आहेत. मात्र तावडे यांचे नाव मुद्दाम मुंडे गटाकडून पसरवण्यात आले होते, असे भाजपतील सूत्रांचे म्हणणे आहे. शेवटपर्यंत नावांबाबत एकमत होत नसल्याने मुंडे व गडकरी गटांना मान्य असलेला उमेदवार म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे नाव निश्चित होण्याची शक्यता भाजपमधील एका वरिष्ठ नेत्याने वर्तविली. ऐन निवडणुकांच्या तोंडावर मुंडे व गडकरी या दोघांनाही नाराज करणे पक्षाला परवडणारे नाही. फडणवीस हे गडकरी यांच्या जवळचे म्हणून ओळखले जात असले तरी मुंडे यांच्याशीही त्यांचे संबंध चांगले आहेत.