मुंबई - पंतप्रधान
नरेंद्र मोदी, काँग्रेस अध्यक्षा
सोनिया गांधी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांची बोगस केशरी रेशनकार्डे दाखवत भाजप आमदार पांडुरंग फुंडकर यांनी विधान परिषद सभागृहात बुधवारी एकच खळबळ उडवून दिली. औचित्याच्या मुद्द्याद्वारे फुंडकर यांनी राष्ट्रीय आणि राज्य नेत्यांची ही बोगस केशरी रंगाची रेशन कार्डे सभागृहात दाखवली.
बुलडाणा जिल्ह्यातील खामगावातील तहसीलदाराच्या सहीची ही रेशन कार्डे असून अशा प्रकारे सहा हजार बोगस रेशन कार्डे तयार करून वाटण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. या शिधापत्रिकांच्या नावांवर मोठ्या प्रमाणावर धान्याचा काळाबाजार करण्यात येत असल्याचेही फुंडकर म्हणाले.
‘विधानसभा निवडणुकीच्या तीन महिने आधी तहसीलदारांच्या सही, शिक्क्याची सहा हजार कोरी रेशनिंग कार्डे तयार करण्यात आली होती. दुकानदारांकडे ठेवून त्याची २२०० रुपयांना विक्री करण्यात येत होती. खोटी नावे टाकून त्याद्वारे मिळणारे धान्य दुकानदाराकडून गायब करण्यात येत होते,’ अशी माहिती देत या प्रकरणी संबधितांची उच्चस्तरीय चौकशी करणार असल्याचे बापट यांनी सांगितले.