आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गावांमध्ये आरोग्य, शिक्षण सेवेसाठी महाराष्ट्र नेटचा वापर : देवेंद्र फडणवीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - राज्यातील गावांमध्ये आरोग्य आणि शिक्षण सेवा पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारच्या “भारतनेट’च्या धर्तीवर राज्य सरकार ‘महाराष्ट्र नेट’चा प्रयोग सुरू करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी केली. महाराष्ट्र शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या २०१५-१६ च्या राज्य आदर्श शिक्षक व सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार १०९ शिक्षकांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आला त्या वेळी ते बोलत होते.

३८ प्राथमिक शिक्षक, ३९ माध्यमिक शिक्षक, १९ आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षक, दोन कला/क्रीडा क्षेत्रातील शिक्षक, दोन स्काऊट गाइड शिक्षक, एक अपंग शिक्षक, आठ सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका अशा एकूण १०९ जणांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला.

फडणवीस म्हणाले, गेली अनेक वर्षे शिक्षणामध्ये सतत १४ किंवा १५ व्या क्रमांकावर असलेला महाराष्ट्र वर्षभरातच तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. अर्थसंकल्पामध्ये शिक्षणासाठी ५० हजार कोटी रुपये दिले जातात. हा खर्च नाही तर ही भविष्याची गुंतवणूक आहे. आजचे शिक्षक पुढील पिढी घडवताहेत, आजच्या शिक्षकांचे भावी पिढी घडवण्यात मोठे योगदान आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमांतर्गत राज्यातील ११ हजार शाळा १०० टक्के प्रगत म्हणून जाहीर करण्यात आल्या आहेत. शासनाच्या शाळांची गुणवत्ता वाढत असून इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांतील विद्यार्थ्यांकडून आता मराठी माध्यमांच्या शासकीय शाळांमध्ये प्रवेश घेतला जात आहे.

याचाच अर्थ शासनाच्या शाळांमध्ये शिक्षण, तेथे राबविले जाणारे प्रयोग हे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण ठरत आहेत. त्यामुळे या शाळांमधून उत्तम संस्कारित विद्यार्थी बाहेर पडतील, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. आज डिजिटल क्रांतीमुळे शेवटच्या घटकापर्यंत शिक्षण पोहोचत आहे. यावर्षी २५ हजार शाळा डिजिटल ऑफलाइन केल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील ७५० ग्रामपंचायती डिजिटल करण्यात आल्या असून डिजिटल क्रांतीमुळे शहर आणि ग्रामीण असा भेदभाव दूर झाला आहे. डिसेंबर २०१८ पर्यंत ग्रामपंचायतीपर्यंत डिजिटल कनेक्टिव्हिटी देण्याचा प्रयत्न आहे. याशिवाय सगळ्या शाळा ऑनलाइन करण्यात येणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अभ्यास मंडळ गठित करून माध्यमिक-उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अनुरूप असे व्यवसाय मंडळ निर्माण करण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने आराखडा तयार करावा, अशा सूचनाही फडणवीस यांनी दिल्या.

काळानुरूप शिक्षण देण्याचा प्रयत्न
शिक्षक चांगला समाज घडवण्याबरोबर महाराष्ट्र घडवण्याचेही काम करत आहे. शिक्षण विभागाने गेल्या दोन वर्षांत प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र, मूल्यवर्धित शिक्षण हे कार्यक्रम राबवले. शिक्षणामुळे महाराष्ट्र आज खऱ्या अर्थाने अधिक प्रगत दिशेने वाटचाल करत आहे. मूल्यवर्धित शिक्षण कार्यक्रम, प्रगत शैक्षणिक कार्यक्रम यामुळे विद्यार्थ्यांच्या क्षमता ओळखून काळानुरूप शिक्षण देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. दहावीतील अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची लगेचच फेरपरीक्षा घेण्याचा निर्णय, गळती रोखण्यासाठी कौशल्यावर आधारित अभ्यासक्रमातून विद्यर्थ्यांची शैक्षणिक प्रगती होण्यास मदत होणार आहे. - विनोद तावडे, शिक्षणमंत्री
बातम्या आणखी आहेत...