मुंबई - ‘लोकसभा निवडणुकीतील कामगिरीवर नजर टाकली असता राज्यात भाजपची ताकद कमालीची उंचावली आहे. विधानसभेतील अनेक जागांवर आता भाजपच्या जिंकण्याच्या क्षमता वाढल्या आहेत. सध्या स्ट्राईक रेट भाजपचा जास्त असल्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आम्हाला शिवसेनेपेक्षा जास्त जागा हव्या आहेत’, असे मत भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले.
महायुतीबाबत विचारले असता फडणवीस म्हणाले, जागा वाटपाबाबत 22 जूननंतर महायुतीची बैठक होणार आहे. यात चर्चा होईल. पण, माझ्या मते ज्या ठिकाणी मागच्या वेळी युतीचा उमेदवार पराभूत झाला आहे, अशा जागेवरही आता भाजप लढायला तयार आहे. शिवसेना 171 व भाजप 117 असा फॉम्युल्यावर जागा वाटप करणे योग्य होणार नाही.
लोकसभा निवडणुकीमुळे बरेचसे निकष बदलले आहेत. शिवाय महायुतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रीय समाज पक्ष व रिपाइं यांनाही सन्मानाने जागा द्यावा लागणार आहेत.
जागा वाटपावरून महायुतीत कुठलाही तिढा निर्माण होणार नाही, याची काळजी मात्र घेतली जाईल. चर्चेमधूनच हा मार्ग सुटू शकतो. हे करताना दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी संयम बाळगायला हवा, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.