आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विरोधकांना आव्हान : नुसते आराेप नकाेत, पुरावे द्या - मुख्यमंत्री

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - एकात्मिक बालविकास प्रकल्पाच्या (आयसीडीएस) २०६ कोटी रुपयांच्या खरेदी घोटाळ्याचे आरोप झाल्यामुळे अडचणीत सापडलेल्या महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठीशी भाजप, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अख्खे सरकार ठामपणे उभे असल्याचे स्पष्ट झाले असून घोटाळा झाल्याचे पुरावे द्या, चौकशीचे आदेश देण्याची माझी तयारी आहे, असे आव्हान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना दिले आहे.

पंकजांवर नियम धाब्यावर बसवून एकाच दिवशी २०६ कोटी रुपयांची कंत्राटे दिल्याचा आरोप असून काँग्रेसने या घोटाळ्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) केली आहे. आयसीडीएसअंतर्गत निविदा न मागवताच चिक्की, चटया, डिशेस, वॉटर फिल्टर, वह्या-पुस्तके आणि कुपोषित मुलांसाठी औषधी किट खरेदीचे दिल्याचे या तक्रारीत म्हटले आहे. त्यावर घोटाळ्याचे आरोप करणार्‍या विरोधकांनी (काँग्रेस -राष्ट्रवादी) पुरावे दिल्यास चौकशी करण्याची माझी तयारी आहे, असे मुख्यमंत्र्यांनी वृत्तसंस्थेला सांगितले. आठ महिन्यांपूर्वी सत्तेत आलेल्या भाजप सरकारचा हा मोठा पहिला घोटाळा असल्याचे सांगत विरोधकांनी त्याची सीबीआय किंवा एसीबीमार्फत चौकशीची मागणी केली आहे.

मुख्यमंत्र्यांनी मांडलेले खुलासेवजा मुद्दे असे
1 काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत होते तेव्हा त्यांनीही दरकरार पद्धतीनुसारच खरेदी केली आहे. त्यामुळे त्यांनीही त्यांनी केलेल्या खरेदीबाबत स्पष्टीकरण दिले पाहिजे म्हणजे त्यांच्या दुटप्पी भूमिकेचा भंडाफोड होईल.

2 एक कोटी रुपयांपेक्षा जास्त खरेदीसाठी ई-निविदा मागवण्याचा शासनादेश १७ एप्रिल २०१५ रोजी काढण्यात आला होता आणि ही खरेदी त्यापूर्वीची आहेे. आयसीडीएसची खरेदी २०१४-१५ या वर्षासाठीची आहे.

3 काँग्रेस- राष्ट्रवादी आघाडी सरकारने दर करार प्रणालीअंतर्गत २०१२-१३ मध्ये १६४ कोटी, २०१३-१४ मध्ये १२७ कोटी आणि जून-जुलै २०१४ मध्ये ५६ कोटी रुपयांची खरेदी केली आहे.

सावंत, काकडेंना जिवे मारण्याच्या धमक्या
दरम्यान, एसीबीकडे या घोटाळ्याची तक्रार करणारे काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी जिवे मारण्याच्या धमक्या आल्याची तक्रार केली आहे. गुरुवारी सायंकाळपासून ४० फोन कॉल्स आले. काहींनी मला जिवे मारण्याची धमकी दिली, तर काहींनी मी पंकजांची माफी मागण्यासाठी धमकावले. राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनीही धमक्या मिळाल्याची तक्रार केली आहे.

शासनादेश अपलोड का केले नाहीत?
या कथित घोटाळ्याशी संबंधित शासनादेश सरकारी वेबसाइटवर अपलोड का केले नाहीत? असा सवाल पुण्याचे आरटीआय कार्यकर्ते विजय कुंभार यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे केला आहे. १३ फेब्रुवारी रोजी एकाच दिवशी २४ शासनादेश काढून २०६ कोटींची कंत्राटे दिली पण एकही शासनादेश अपलोड केला नाही, हे धक्कादायक आहे, असे कुंभार यांनी म्हटले आहे.

हा बहुजन नेत्याच्या बदनामीचा डाव : आठवले
रिपाइं नेते रामदास आठवले यांनी पंकजाची पाठराखण केली आहे. पंकजा मागासवर्गीय असल्यामुळे त्यांना मुद्दाम टार्गेट केले जात आहे. लोकप्रिय ओबीसी नेत्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न काँग्रेस करत आहे. पंकजांच्या प्रामाणिकपणाबद्दल शंका घेतली जाऊ शकत नाही, असे आठवले म्हणाले.