आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हेलिकॉप्टर अपघातातून पुन्हा बचावले CM फडणवीस; मुख्यमंत्री कार्यालय म्हणते ही केवळ अफवा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - गडचिरोली व निलंगा येथील हेलिकाॅप्टर दुर्घटनेत सुदैवाने बचावलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शुक्रवारी पुन्हा एकदा  हेलिकाॅप्टर प्रवासादरम्यान जिवावर बेतणारा थरारक अनुभव अाला. अलिबागहून मुंबईकडे निघालेले मुख्यमंत्री हेलिकॉप्टरमध्ये चढण्यासाठी पाऊल ठेवणार तेवढ्यात हेलिकाॅप्टर लँडिंग मार्कच्या पुढे सरकल्यामुळे मागील पाते मुख्यमंत्र्यांच्या  डोक्याला लागण्याचा धाेका उद्भवला हाेता. मात्र सुरक्षा रक्षकांनी प्रसंगावधान राखून तातडीने त्यांना सुरक्षितस्थळी नेल्याने बाका प्रसंग टळला.
 
शेकापचे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उद््घाटन सोहळ्यासाठी मुख्यमंत्री  शुक्रवारी अलिबाग येथे होते. दुपारी कार्यक्रम संपल्यानंतर सव्वाच्या सुमारास  शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासह ते मुंबईला  परतण्यासाठी निघाले. दुपारी १.५५  वाजता मुख्यमंत्री  आणि तावडे हेलिपॅडजवळ पोहोचले तेव्हा हेलिकॉप्टर सुरू झाले होते.  यादरम्यान मुख्यमंत्री दरवाजाला धरून चढणार तोच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेतला. सुरक्षा रक्षकांनी त्यांना तातडीने सुरक्षित  ठिकाणी हलवले. या वेळी थोडी तत्परता दाखवली  नसती तर हेलिकॉप्टरचा मागील पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागला असता.

जिल्हाधिकाऱ्यांनी घटनेला दिला दुजाेरा, मुख्यमंत्री कार्यालय म्हणते ही अफवा
अलिबागचे जिल्हाधिकारी पी. डी. मलिकनेर यांनी मुख्यमंत्री थोडक्यात बचावल्याच्या बातमीला दुजोरा दिला. मात्र मुख्यमंत्री  कार्यालयाकडून असे काही घडले नसल्याचे सांगण्यात अाले. अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही अावाहन करणारे संदेश पाठवले जात हाेते.  जिल्हाधिकारी व प्रत्यक्षदर्शी  मुख्यमंत्री  अपघातातून थोडक्यात बचावले असे सांगत असताना मुख्यमंत्री  कार्यालय मात्र दुजोरा का देत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात अाहे.

निलंग्यातील दुर्घटनेची अाठवण
गडचिरोलीत हेलिकाॅप्टर बिघाडामुळे मुख्यमंत्र्यांवर संकट कोसळले होते, पण चालकाच्या  प्रसंगावधानाने ते वाचले होते. अलीकडेच २५ मे रोजी निलंग्याहून मुंबईस  येत असताना फडणवीस यांना मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागले होते. तेव्हा मुख्यमंत्र्यांना  घेऊन उडालेले हेलिकाॅप्टर विद्युत तारेला लागून काही मिनिटांतच खाली काेसळले हाेते. त्यात हेलिकाॅप्टरचे अक्षरश: तुकडे झाले हाेते. त्यातून सुदैवाने मुख्यमंत्री बचावले. अलिबागमधील  प्रसंगामुळे पुन्हा एकदा ही आठवण ताजी झाली.
 
पुढील स्लाइडवर, एक महिन्यापूर्वी कोसळले होते मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर... 
बातम्या आणखी आहेत...