आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका दिवसात युती तोडता येत नाही : देवेंद्र फडणवीस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘आणखी किती वर्षे शिवसेनेच्या वृक्षाखाली बोन्साय होऊन राहायचे,’ असा सवाल करत आगामी विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवण्याची मागणी करणार्‍या भाजपच्या पदाधिकार्‍यांना प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी संयम राखण्याचे आवाहन केले.

‘शिवसेनेबरोबर आमची युती ही विचारांवर झालेली आहे. ती एका दिवसात तोडता येणार नाही. शिवसेनेने आम्हाला सुखात तसेच दु:खातही साथ दिली आहे. आता चांगले दिवस येत असताना मित्रांना अर्ध्या वाटेवर सोडून जाता येत नाही’, असे स्पष्ट करतानाच पदाधिकार्‍यांच्या भावनांची निश्चितच दखल घेतली जाईल, असेही फडणवीस यांनी सांगितले.

भाजपची प्रदेश कार्यकारिणी व पदाधिकार्‍यांचा मेळावा गुरुवारी अंधेरीच्या शहाजी राजे क्रीडा संकुलात पार पडला. या वेळी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी. महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रूडी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते व ज्येष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

या मेळाव्यात गडकरींनी आपल्या बोलण्याचा सूर मात्र राज्यात महायुतीची सत्ता आणण्याकडे ठेवला. ते म्हणाले, ‘काँगे्रस आघाडी सरकार गेल्या 15 वर्षांत काय कामे करू शकले नाही, याचा अहवाल तयार करा आणि महायुतीचेही व्हिजन डॉक्युमेंट तयार करा. या दोन्ही गोष्टी लोकांसमोर ठेवा. हे ठेवताना महायुतीच महाराष्ट्रात देशात एक क्रमांकाचे राज्य करू शकते, असा विश्वास लोकांमध्ये निर्माण करा. असे केले तर महायुतीला फायदा होईल.’

जास्त जागा पदरात पाडून घेण्याचा डाव
पदाधिकार्‍यांच्या तोंडून युती तोडण्याची भाषा करायची, मात्र आपण सबुरीचा सल्ला द्यायचा, ही भाजप नेत्यांची भाषा म्हणजे 288 पैकी निम्म्या 148 जागा पदरात पाडून घेण्याचे हे डावपेच असल्याचे बोलले जाते. पाच वर्षांपूर्वी शिवसेना ज्या ठिकाणी तिसर्‍या किंवा चौथ्या क्रमांकावर राहिली, अशा किमान 35 ते 40 जागा भाजपला पदरात पाडून घ्यायच्या आहेत.

(फोटो - देवेंद्र फडणवीस)