मुंबई- राज्यात नुकत्याच झालेल्या महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांत मोठे यश मिळाल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी किल्ले रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. रयतेचे राज्य स्थापन करण्याची प्रेरणा मिळवण्यासाठी महाराजांचे आशीर्वाद घेतल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या वेळी त्यांनी कुठलेही राजकीय भाष्य केले नाही. या वेळी त्यांच्यासाेबत भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, विनोद तावडे, आशिष शेलार, सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते.
पारदर्शक कारभाराचा विश्वास आणि परिवर्तनाचा नारा देत भाजपने फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील १० महानगरपालिका आणि २५ जिल्हा परिषदांच्या निवडणुका लढवल्या होत्या. भाजपची धुरा एकहाती सांभाळत त्यांनी चांद्यापासून बांद्यापर्यंत प्रचाराचा धुराळा उडवून दिला होता. एका दिवशी सहा सभा घेत त्यांनी राज्याचा कानाकोपरा ढवळून काढला. त्यांच्या या प्रयत्नांना राज्यातील जनतेने साथ देत भाजपच्या पारड्यात भरभरून यश टाकले. हे यश महाराजांच्या चरणी अर्पण करण्यासाठी आपण रायगडावर आल्याची भावनाही फडणवीसांनी व्यक्त केली.
मुंबई आणि ठाणे वगळता उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी चिंचवड, सोलापूर, अकोला, अमरावती व नागपूर या महापालिकांमध्ये भाजप अव्वल क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. याचबरोबर मुंबईतही त्यांनी ३१ जागांवरून ८२ जागांपर्यंतचा मोठा पल्ला गाठला आहे. याचबरोबर जिल्हा परिषदांमध्येही भाजपची कामगिरी प्रचंड उंचावली आहे. या यशामुळे फडणवीसांना राजकीय वजन वाढले असून स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी व राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी फडणवीसांच्या कामगिरीची नोंद घेत त्यांचे अभिनंदन केले आहे.