मुंबई - देशाला स्वातंत्र्य मिळून आज ६८ वर्षांचा काळ लोटला. परंतु समाजातील अनेक जातीपातींना अजूनही सामाजिक न्याय मिळालेला नाही. त्यापैकीच एक म्हणजे धनगर समाज. एकूण बावीस पोटजातीत विभागलेला निमभटका धनगर समाज आजही प्रशासन आणि तथाकथित उच्चवर्णीय तसेच सावकारांकडून होणारे अत्याचार मुकाट सहन करत आहे. त्यांच्यापैकी डंगे धनगर समाजाची व्यथा मांडणारा ‘धनगरवाडा’ हा चित्रपट येत्या २७ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होत आहे. सदाशिव अमरापूरकर यांनी अभिनय केलेला हा अखेरचा चित्रपट होय.
या चित्रपटातील कलाकारांनी मुंबईतील दै. दिव्य मराठीच्या माहिमच्या कार्यालयाला शुक्रवारी भेट देऊन संवाद साधला. राम-लक्ष्मण प्रॉडक्शन व अलका कुबल-शिल्पा मसुरकर प्रस्तुत हा चित्रपट आहे. विजयकुमार दळवी यांच्या ‘धनगरवाडा’ या गाजलेल्या कादंबरीवर आधारीत या चित्रपटात दिवंगत ज्येष्ठ अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांनी ‘झिमू’ या जातपंचायतीच्या प्रमुखाची भूमिका साकारली आहे.
या चित्रपटासंदर्भात अभिनेत्री अलका कुबल यांनी सांगितले, वरद विजय चव्हाण, पल्लवी पाटील, मिलिंद गवळी, गणेश यादव, माधव अभ्यंकर, सुहासिनी देशपांडे, पूजा पवार, जयवंत वाडकर आणि गणेश आगलावे यांच्या ‘धनगरवाडा' चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत. यंदाच्या राज्य चित्रपट पुरस्कारात या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक परीक्षित भातखंडे यांना सर्वोत्कृष्ट संगीतकार आणि अभिनेत्री पल्लवी पाटील यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री- प्रथम पदार्पण पुरस्काराने गौरविण्यात आले. अडीचशेहून अधिक चित्रपटांचे छायांकन केलेले ख्यातनाम सिनेमॅटोग्राफर समीर आठल्ये यांनी धनगरवाडा या चित्रपटाच्या निमित्ताने दिग्दर्शन क्षेत्रात पहिलं पाऊल टाकलं आहे.
सव्वाशे जत्रांमध्ये दाखवला जाणार
महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील चंदगड तालुक्यातील उंच डोंगरमाथ्यावर घनदाट जंगलात वसलेल्या एका धनगरपाड्यावर या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाले. त्यामुळे चित्रपटाला लाभलेला एक वेगळाच नैसर्गिक ताजेपणा डोळ्यांना नक्कीच सुखावेल, असं आठल्ये यांनी सांगितले. २७ नोव्हेंबर रोजी धनगरवाडा प्रदर्शित झाल्यानंतर महाराष्ट्रातील सव्वाशे जत्रांमध्ये हा चित्रपट दाखवला जाणार आहे.