आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनंजयची हकालपट्टी; भाजप नेत्यांत मतभेद

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या परळीतील जाहीर कार्यक्रमामध्ये व्यासपीठावर हजेरी लावून ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडेंवर टीकास्त्र सोडणारे भाजपचे आमदार धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई करण्यावरूनही भाजपमधील मुंडे- गडकरी गटात मतभेद निर्माण झाले आहेत. धनंजयला पक्षातून काढल्यास त्याची आमदारकी कायम राहील, त्यामुळे त्यांनी स्वत:हूनच पक्ष सोडावा, असा प्रयत्न मुंडे गटाकडून केला जात आहे. तर शिस्तभंगाची कारवाई करून त्यांची थेट हकालपट्टीच करावी यासाठी गडकरी गट आग्रही आहे. या मतभेदामुळे कारवाईला विलंब होत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
आमदार धनंजय मुंडे यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्याविरोधात बंड उभारून परळी वैजनाथ नगर पालिकेत अपक्ष उमेदवाराला नगराध्यक्ष केले. त्यानंतर मुंडे व धनंजय यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी चांगल्याच गाजल्या. धनंजयचे वडील व गोपीनाथरावांचे ज्येष्ठ बंधू यांनीही मुलाची पाठराखण करत या वादात उडी घेतली व गोपीनाथरावांवर जाहीर आरोप केले. त्यापाठोपाठ बाजार समितीत राष्ट्रवादी व कॉँग्रेसची मदत घेऊन पंडितअण्णा बिनविरोध निवडून आले. गुरुवारी पंडितअण्णांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉँग्रेसमध्ये जाहीर प्रवेशही केला. परळीत झालेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर भाजपचे आमदार असलेले धनंजय हे उपस्थित होते. हे वर्तन उघडपणे पक्षविरोधी असून त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत भाजपमधून हकालपट्टी करावी, अशी आग्रही मागणी आता भाजपमधील गडकरी गडातर्फे केली जात आहे. मात्र धनंजयला पक्षातून काढून टाकल्यास त्याची आमदारकी कायम राहील. त्याउलट त्यांनी स्वत:हून पक्ष सोडून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यास त्यांना विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून पुन्हा निवडून यावे लागेल. त्यामुळे त्यांना काढू नये तर पक्षाबाहेर जाण्यास भाग पाडावे, असा आग्रह मुंडे गटाकडून केला जात आहे.

आमदारकीचे कोडे
दरम्यान, धनंजय यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यास त्यांची आमदारकी गेली तरी उपमुख्यमंत्री अजित पवार आपली संपूर्ण ताकद लावून त्यांना पुन्हा निवडून आणू शकतात. त्यामुळे काहीही झाले तरी धनंजय आमदार राहू शकतो. या परिस्थितीत त्यांच्यावर कारवाई केल्यास निदान पक्षविरोधी कारवाया खपवून घेतल्या जात नसल्याचा संदेश बंडखोरांमध्ये जाईल, असे गडकरी गटाचे म्हणणे आहे.
सध्या पक्षात मनमानी किंवा पक्षविरोधी कारवाया केल्या तरी कठोर कारवाई होत नाही, असे चित्र निर्माण झाले आहे. धनंजयवर कारवाई केल्यास त्याला छेद देणे शक्य होईल, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने सांगितले.

वादामुळेच कारवाई लांबली
गडकरी आणि मुंडे गटातील या वादामुळेच इतके दिवस धनंजय यांच्यावर काहीच कारवाई करण्यात आली नव्हती. शिस्तभंग समितीचा अहवाल आला की केंद्रीय नेतृत्व कारवाईचा विचार करेल, असे पक्षाकडून सांगितले जात होते. पण आज धनंजय यांनी राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून गोपीनाथ मुंडे यांच्यावर टीका केल्याने भाजपमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे. तरीही धनंजयवर कारवाई झाली नाही तर कार्यकर्त्यांमधली अस्वस्थता वाढू शकेल, असे भाजपच्या ज्येष्ठ नेत्याचे म्हणणे आहे. त्यामुळे निदान आता तरी धनंजयच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे ही मागणी पक्षामध्ये जोर धरत आहे.

आमदारकी रद्द करण्याची मागणी : तावडे
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे यांनी सांगितले की, धनंजय यांची आमदारकी रद्द व्हावी म्हणून विधान परिषदेचे अध्यक्ष शिवाजीराव देशमुख यांच्याकडे पक्षातर्फे मागणी केली जाणार आहे. तसेच शिस्तभंग समितीकडे त्यांच्याबद्दल अहवाल पाठवण्यात आला आहे.