आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhananjay Munde Commented On Drought Affected Farmers

.. तर मंत्र्यांना रस्त्यावर फिरणे मुश्कील होईल, मुंडे यांचा इशारा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- केंद्रीय कृषिमंत्री, मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ केंद्रीय अधिकाऱ्यांच्या पथकाने वारंवार पाहणी दौरे करूनही मराठवाडा राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या हाती काहीही लागलेले नाही, सध्या सुरू असलेल्या केंद्रीय पथकाच्या तिसऱ्या दुष्काळी दौऱ्यातूनही राज्याला मदत मिळण्याची सुतराम शक्यता नाही. मदतीबद्दल दिरंगाई आणि चालढकल अशीच सुरू राहिल्यास राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकरी रस्त्यावर उतरतील आणि मंत्र्यांना फिरणं कठीण होईल, असा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी शनिवारी सरकारला दिला.
मुंडे म्हणाले, हे सरकार सत्तेवर आल्यापासून एकट्या मराठवाड्यात एक हजार ४५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. राज्यातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा तीन हजारांवर पोहोचला आहे. दिवाळीतच मराठवाडा, वऱ्हाड आणि खान्देशात ३५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. ही शासकीय आकडेवारी आहे. टँकरची संख्या कमी झाल्याचे शासनाकडून सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी आहे. बीडसारख्या भीषण टंचाई असलेल्या अनेक जिल्ह्यांत पैसे दिल्याने टँकर बंद होत आहेत. जलयुक्त शिवार योजना यशस्वी होत असल्याचे सांगण्यात येत आहे, तर राज्यातील टँकरची संख्या का वाढतेय याचे उत्तरही सरकारने द्यावे, असेही मुंडे म्हणाले.

भारतीय जनता पक्षाने ओरिसातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी आंदोलन छेडले आहे. तेथील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देणे भाजपला आवश्यक वाटत आहे तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी वेगळा न्याय का, असा प्रश्नही या वेळी मुंडे यांनी उपस्थित केला.
आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर गंभीर असणारे पंतप्रधान मोदी, महाराष्ट्रातील दुष्काळ शेतकऱ्यांच्या व्यथांबाबत "चाय पे चर्चा' किंवा "मन की बात' सह कुठल्याच मंचावर बोलायला तयार नाहीत. सध्याच्या राज्यकर्त्यांना महाराष्ट्रातला दुष्काळ कळलाच नसल्याचा आरोप त्यांनी केला.