आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhananjay Munde News In Marathi, MNS, Raj Thackeray, Divya Marathi

मुंडे काका-पुतण्याला हवी राज ठाकरेंची मदत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बीडमध्ये रंगलेल्या मुंडे काका- पुतण्याच्या वादात आता मनसेची एंट्री झाली आहे. मनसेने या मतदारसंघात आपला उमेदवार उभा करावा, असे काकांना वाटते, तर इतर पक्षांकडून कोणतीही छुपी मदत गोपीनाथरावांना होऊ नये, यासाठी पुतण्याची धडपड सुरू आहे. याच प्रयत्नांतून राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांनी शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली.


बीडमध्ये राष्ट्रवादीचे उमेदवार सुरेश धस यांची मते खाण्यासाठी मनसेने आपला उमेदवार उभा करावा, अशी विनंती गोपीनाथ मुंडे यांनी राज ठाकरेंना केल्याची कुणकुण राष्‍ट्रवादीला लागली होती. त्यानुसार राज ठाकरेंच्या भूमिकेचा अंदाज घेण्यासाठी धनंजय मुंडेंनी शुक्रवारी ‘कृष्णकुंज’ गाठून त्यांच्याशी चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले. या दोघांमध्ये सुमारे तासभर झालेल्या चर्चेदरम्यान गोपीनाथ मुंडेंना कोणतीही मदत करू नका, अशी विनंती धनंजय यांनी राज यांना केल्याचे कळते. राज ठाकरे यांनी मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया न देता आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवली आहे. राज ठाकरेंनी आतापर्यंत 9 मतदारसंघांत उमेदवार उभे केले असून दोन ठिकाणी शेकापला पाठिंबा दिला आहे. बीडमध्ये सध्या तरी उमेदवार उभा करण्याचा मनसेचा कोणताही विचार नसल्याचे पक्षाच्या एका नेत्याने सांगितले.


मुंडे- गडकरींची अशीही मतभिन्नता
राज्यात भाजपच्या विरोधात मनसेचे उमेदवार उभे करू नका यासाठी भाजप नेते नितीन गडकरींनी राज ठाकरेंची प्रत्यक्ष भेट घेऊन विनंती केली होती. त्यामुळे मित्रपक्ष शिवसेनेची नाराजीही त्यांनी ओढावून घेतली होती. मनसेच्या उमेदवारांमुळे भाजपची मतविभागणी होऊन त्याचा फायदा आघाडीला होऊ नये असा विचार त्यामागे होता. पण दुसरीकडे गोपीनाथ मुंडेंना मात्र आपल्या बीड मतदारसंघात कॉँग्रेस- राष्‍ट्रवादी आघाडीची मते खाण्यासाठी मनसेचा उमेदवार हवा आहे. त्यामुळे इथेही गडकरी आणि मुंडे यांची मते जुळत नसल्याची मल्लीनाथी मनसेच्या एका नेत्याने केली.