आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धनगर समाजाला फसवणार नाही, मुख्यमंत्र्यांचे स्पष्टीकरण; विराेधक मात्र अाक्रमक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- ‘काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने दिलेले मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात स्थगित झाले. याच काँग्रेस-राष्ट्रवादीने जाहीर केलेले मुस्लिम आरक्षणही न्यायालयाने उडवून लावले. धनगर आरक्षणाच्या बाबतीत आम्हाला अशी फसवणूक करायची नाही. कोर्टाच्या पायरीवर टिकणारे आरक्षणच आम्ही देऊ. त्यासाठी सरकार कटिबद्ध आहे,’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत स्पष्ट केले.

मंगळवारच्या कामकाजाची सुरुवात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सदस्यांनी धनगर आरक्षणाच्या मागणीने केली. त्यासाठी दाेन्ही पक्षांचे सदस्य पिवळे फेटे, खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी अशा वेशात विधानसभेत आले होते. त्यावर ‘सत्ता गेल्यानंतर १५ वर्षांनी का होईना, पण तुम्हाला धनगर समाजाचा पुळका आला हे चांगले झाले,’ असा टोला या वेळी फडणवीस यांनी लगावला. अध्यक्षांनी कामकाजाची सुरुवात प्रश्नोत्तराच्या तासाने सुरू केली. मात्र, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उभे राहून धनगर आरक्षणाचा मुद्दा उपस्थित केला. ‘धनगर आरक्षणाचे आश्वासन देऊनही सरकारने ते पूर्ण केलेले नाही. या सरकारची भूमिका सामाजिक न्यायाची नाही,’ अशी टीका विखेंनी केली.

राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी सांगितले, "वर्षापूर्वी बारामतीमध्ये धनगर समाजाने आरक्षणासाठी मोर्चा काढला होता. त्या वेळी भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी आमचे सरकार पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षणाचा निर्णय घेईल, असे आश्वासन दिले. मात्र, अजूनही त्यावर काही निर्णय न झाल्याने या सरकारने फसवणूक केल्याची भावना धनगर समाजामध्ये निर्माण झाली आहे.’ धनगरांना आरक्षण देण्यासंदर्भातला प्रस्ताव राज्य सरकारने तातडीने केंद्राला पाठवावा, अशी मागणी शेकापचे गणपतराव देशमुख यांनी केली.

मागण्यांना उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, "वर्षभरापूर्वी बारामतीला आंदोलन झाले त्या आंदोलकांना भेटण्यासाठी त्या वेळचे सत्ताधारी गेले नाहीत. मी त्या वेळी उपस्थित होतो. मात्र, आम्हाला धनगर समाजाची फसवणूक करायची नाही. कोर्टातसुद्धा धनगरांचे आरक्षण कायम राहिले पाहिजे. "काँग्रेस-राष्ट्रवादी'ने जाहीर केलेल्या मराठा-मुस्लिम आरक्षणाप्रमाणे धनगर समाजाचे आरक्षण अडचणीत येऊ देणार नाही. धनगरांना आरक्षण देण्याचा शब्द आम्ही पुरा करू.’ दरम्यान त्यांच्या उत्तरानंतर विरोधकांनी सरकारविरोधी घोषणाबाजी करत सभात्याग केला.

‘मुख्यमंत्र्यांची भूमिका गरज सरो व वैद्य मरो’
‘विराेधी पक्षात असताना धनगर अारक्षणाचा मुद्दा विधिमंडळात मांडणारे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर हा विषय मार्गी लावण्यास विलंब का करत अाहेत? अाज मुख्यमंत्र्यांची भूमिका गरज सरो वैद्य मरो बनली आहे,’ अशी टीका धनगर अारक्षण कृती समितीने मंगळवारी बारामतीत केली. धनगर अारक्षणाच्या बारामतीतून सुरू केलेल्या लढ्याला २१ जुलै राेजी वर्ष पूर्ण झाले, त्यानिमित्त अायाेजित प्रेरणा दिनाच्या कार्यक्रमात समितीचे नेते बाेलत हाेते. या कार्यक्रमात भाजपच्या एकाही वरिष्ठ नेत्याने हजेरी लावली नाही. दरम्यान, हिवाळी अधिवेशनात चौंडी येथून नागपूरला मशाल यात्रा काढणे अादी ठराव या वेळी घेण्यात अाले. ‘अारक्षणाचा प्रश्न महत्त्वाचा असून एक वेळ पक्ष साेडावा लागला तरी चालेल, परंतु अारक्षण मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही,’ असा इशारा भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी दिला.