आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhangar Samaj Pandharpur To Baramati Padyatra News

NEWS @ MH: धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक, विधानभवनात घुसवल्या मेंढ्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(छायाचित्र: धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा फायदा मिळावा या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढलेल्या पंढरपूर ते बारामती पदयात्रेचा आज समारोप झाला.)
पुणे- विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याअगोदर धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या आरक्षणाचा फायदा मिळावा या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काढलेल्या पंढरपूर ते बारामती पदयात्रेचा आज समारोप झाला. पदयात्रेची सांगता शरद पवारांच्या बारामतीतील निवासस्थानी करण्यात आली. यावेळी ढोल-गजांच्या निनादात आरक्षणाची जोरदार मागणी करण्यात आली. या पदयात्रा सांगता समारंभाला बहुजन समाजाच्या नेत्या पंकजा मुंडे, आमदार प्रकाश शेंडगे, आमदार आर जी रूपनवर, आमदार रामराम वडकुते यांच्यासह राज्यातील धनगर समाजाचे नेते व समाजबांधव उपस्थित होते.
त्यापूर्वी राज्यातील सर्व जिल्ह्याच्या ठिकाणी धनगर समाजाच्या बांधवांनी आंदोलन करीत सरकारचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला. पुण्यातील विधानसभा भवनात (कौन्सिल हॉल) धनगर समाजाच्या लोकांनी मेंढ्या घुसवल्या व वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडत सरकार व प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. यावेळी आंदोलनकर्ते पारंपारिक वेशात आले होते. पंढरपूरातून श्री विठूरायाचे दर्शन घेऊन मंगळवारी (15 जुलै) या पदयात्रेची सुरुवात करण्यात आली होती. आमदार प्रकाश शेंडगे यांच्या नेतृत्त्वाखाली पदयात्रेत हजारो धनगर समाजबांधव सहभागी झाले होते.
धनगर जमातीचा भारतीय राज्यघटनेनुसार आदिवासी जमातीच्या यादीमध्ये (अनु. क्र. 36) समाविष्ट आहे. मात्र, या सवलतीपासून समाजाला जाणीवपूर्वक वंचित ठेवले जात आहे असे या समाजाचे म्हणणे आहे. पदयात्रेच्या मध्यभागी अहिल्यादेवी होळकर यांची आकर्षक आणि भव्य मूर्ती रथात ठेवण्यात आलेली होती. राज्यातून सुमारे एक ते दीड लाख धनगर समाजबांधव बारामतीत आज सहभागी झाल्याचे सांगण्यात आले.

ढोल, भेदिक गाणी आणि टोप्यांनी वेधले सर्वांचे लक्ष- सरकार व प्रशासनातील लोकांचे लक्ष वेधण्यासाठी धनगर समाजातील बांधव ढोलच्या तालावर नाचून धनगरी ओव्या म्हणत होते. या वेळी समाजातील काही मंडळींनी पोवाडे, भेदिक गाणी गायली. यावेळी धनगर समाज बांधवांनी गळ्यामध्ये पिवळ्या रंगांचे पंचे आणि डोक्यावर गांधी टोप्या परिधान केलेल्या होत्या. या टोप्यावर 'उठ धनगरा जागा हो, आरक्षणाचा धागा हो' असा मजकूर लिहिल्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेत होत्या.

घोषणांनी परिसर गेला दणाणून- या वेळी अहिल्यादेवी होळकरांचा विजय असो, उठ धनगरा जागा हो, आरक्षणाचा धागा हो, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे, कोण म्हणतंय देत नाही घेतल्याशिवाय रहात नाही, आमच्या मागण्या मान्य करा नाही तर खुर्च्या खाली करा आदी घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
पुढे पाहा, या आंदोलनासंबंधितील छायाचित्रे...