आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dhangars Demand To Be Moved From NT To ST Category

आरक्षण नाही, तर मतेही नाही, टाळाटाळ करणार्‍या दोन्ही कॉँग्रेसला इशारा

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अनुसूचित जमातीत धनगर समाजाचा समावेश करावा, या मागणीसाठी शुक्रवारी आरक्षण कृती समितीच्या वतीने मुंबईत मोर्चा काढण्यात आला. पारंपरिक वेशभूषेत शेळ्या-मेंढ्यांसह धनगर समाजातील लोक या मोर्चात सहभागी झाले होते. तसेच आरक्षणाला विरोध करणारे मंत्री मधुकर पिचड व पद्माकर वळवी यांच्या विरोधात नारेबाजीही करण्यात आली. दरम्यान, दहा लाख लोक मुंबईच्या रस्त्यावर उतरवू, असा दावा करणार्‍या कृती समितीच्या मोर्चात केवळ सात ते आठ हजार आंदोलक दिसले. आरक्षण न दिल्यास सरकारला विधानसभेत मते देणार नसल्याचा इशारा आंदोलकांनी दिला.
बारामतीमधील बेमुदत उपोषण सोडल्यानंतर धनगर समाजाच्या नेत्यांनी मुंबईत भव्य मोर्चा काढण्याची योजना आखली होती. शुक्रवारी भायखळ्यातील राणेबागेपासून मोर्चाला सुरुवात करण्यात आली. काहींनी अंगावर घोंगडी व हाती काठी घेतली होती. शेळ्या-मेंढ्यांचाही मोर्चात सहभाग होता. धनगरी ओव्या म्हणत, भंडारा उधळत हा मोर्चा दुपारी आझाद मैदानावर आला. या ठिकाणी मोर्चाचे सभेत रूपांतर झाले.

धनगर ही जात नव्हे, तर जमातच
भारिपचे आमदार हरिभाऊ बधे, लोकसंग्रामचे आमदार अनिल गोटे, राष्ट्रÑवादीचे आमदार रामराव वरकुटे यांचीही या वेळी भाषणे झाली. धनगर जमात नसून ती जात आहे, हा मुद्दा खोडून काढण्यासाठी आजचा मोर्चा होता. आमची संस्कृती, परंपरा दाखवण्याचा आम्ही प्रयत्न केला, अशी माहिती धनगर समाज आरक्षण कृती संघर्ष समितीचे समन्वयक नवनाथ पडळकर यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. कोणत्याही परिस्थितीत आरक्षण घेणार असल्याचा पुनरुच्चर त्यांनी केला.

पवार, पिचडांवर टीका
मधुकर पिचड यांची राष्ट्रवादी काँग्रेसने हकालपट्टी करावी, अशी मागणी ‘रासप’ नेते महादेव जानकर यांनी केली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही त्यांनी कठोर शब्दांत टीका केली. राज्यात महायुतीची सत्ता आल्यास धनगर समाजाचा अनुसूचित जमातीत समावेश करण्याची शिफारस करण्यात येईल, असे वचन भाजप आमदार प्रकाश शेंडगे यांनी दिले. धनगड आणि धनगर हा अपभं्रश नाही, दोन्ही समाज एकच असल्याचा प्रस्ताव राज्य शासनाने त्वरित पाठवावा, अशी मागणी राष्ट्रÑवादीचे माजी आमदार रमेश शेंडगे यांनी केली.

मंत्री मधुकर पिचड, वळवींचा निषेध
मोर्चेकर्‍यांच्या हाती मोठ्या प्रमाणात पिवळे झेंडे होते. ‘उठ धनगरा जागा हो, आरक्षणाचा धागा हो!, ‘आरक्षण नाही, तर मत नाही’ अशा घोषणा मोर्चात दिल्या जात होत्या. धनगरांच्या अनुसूचित जमातीमधील समावेशाला विरोध करणारे राज्याचे आदिवासी विकास मंत्री मधुकर पिचड आणि क्रीडामंत्री पद्माकर वळवी यांच्या निषेधाच्या घोषणा कार्यकर्ते देताना दिसत होते. जातीचे राजकारण करणार्‍या या दोन्ही नेत्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणीही आंदोलकांनी केली.

डांगे-देशमुखांची गैरहजेरी
‘शेकाप’चे आमदार गणपतराव देशमुख (सांगोला) आणि विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे अध्यक्ष अण्णा डांगे (राष्ट्रÑवादी) हे धनगर समाजाचे ज्येष्ठ नेते समजले जातात. मात्र, त्यांची मोर्चाला अनुपस्थिती होती.

आंदोलनाचा रविवारी फैसला
मुख्यमंत्र्यांना आम्ही आठ दिवसांची मुदत दिली होती. ती शनिवारी संपत आहे. रविवारी कृती समितीची बारामतीत बैठक आहे. तोपर्यंत तोडगा निघायला हवा. नाहीतर धनगर समाजाचे आंदोलन राज्यभर नेणार असल्याचे कृती समितीचे अध्यक्ष हनुमंत सूळ यांनी सांगितले.
छायाचित्र - धनगर समाजाला अनुसूचित जमातीत आरक्षण द्यावे, या मागणीसाठी शुक्रवारी आरक्षण कृती समितीच्या वतीने भायखळा ते आझाद मैदानदरम्यान मोर्चा काढण्यात आला. धनगर समाजाच्या आरक्षणाला विरोध करणार्‍यांविरोधात या वेळी घोषणाबाजी करण्यात आली.