आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पहिले कॅशलेस गाव हाेण्याचा धसईत निर्धार, रणजित सावरकरांचा पुढाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - नोटाबंदीच्या निर्णयानंतर पंतप्रधानांच्या मोहिमेत सहभागी होऊन सर्व व्यवहार कॅशलेस (राेखमुक्त) करण्याचा यशस्वी प्रयत्न स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे कार्याध्यक्ष रणजित सावरकर यांनी केला आहे. मुरबाड (ठाणे) तालुक्यातील धसई गाव रणजित सावरकर यांच्या प्रयत्नामुळे देशातील पहिले कॅशलेस गाव ठरणार आहे.

मुरबाड तालुक्यातील मोठी बाजारपेठ समजले जाणारे धसई गाव सुमारे १० हजार लोकवस्तीचे आहे. या ठिकाणी १५० हून अधिक व्यापारी असून त्यांच्या व्यवसायात दररोज एक कोटी रुपयांची उलाढाल होत असते. धसई सहकारी सोसायटी, दुग्ध, भात, धान्य, किराणा व्यापारी वर्गाच्या संस्था यांच्या माध्यमातून व्यापार होत असतो. केवळ गावातीलच नव्हे भोवतालच्या परिसरातील टोकावडे, आनंदवाडी, पळू, सोनावले, रामपूर, कळंबाड, जायगाव, मिल्हे, देहरी, खेवारे आदी गावांतील नागरिक व व्यापारीदेखील या ठिकाणी खरेदी-विक्रीचे व्यवहार करत असतात. साधारणतः ६० ते ७० गावे भोवतालच्या भागात आहेत. आतापर्यंत ३४ व्यावसायिकांनी अातापर्यंत कार्ड स्वाइप मशीनसाठी अर्ज केला असून उर्वरित व्यापाऱ्यांकडून औपचारिक कागदपत्रांची पूर्तता केली जात आहे. येथील प्रत्येक कुटुंबाकडे जनधन खाते असून डेबिट कार्डही आहे. त्यामुळे ही मंडळी वडापावपासून भाजीपाला, धान्य, औषधे, खते व इतर सर्व गरजांसाठी आता डेबिट कार्ड वापरू शकतील. हे कार्ड केशकर्तनालय, दवाखाने, मोटार गॅरेजेस पासून अगदी शेतीकामासाठी ट्रॅक्टर भाड्याने घेण्यासाठीही वापरू शकतील. रोखमुक्तीचा फायदा सुमारे ५० हजार लोकांना होणार असून त्यांना बँकेतून रोकड काढण्याची गरज पडणार नाही.

या गावात केवळ एकच राष्ट्रीयीकृत बँक असल्याने तिच्यावर मोठ्या प्रमाणावर ताण पडत आहे. त्यामुळे अनेक व्यापाऱ्यांना सरळगाव या सुमारे १५ किलोमीटर अंतरावर असलेल्या गावी लावे लागते. सध्याच्या नोटाबंदीमुळे तर हे सर्वजण मेटाकुटीला आले आहेत. ही बाब ध्यानात आल्यानंतर रणजित सावरकर यांनी पुढाकार घेऊन स्थानिक ग्रामस्थ तसेच व्यापारी वर्गाशी संपर्क साधला. कैलास घोलप, स्वप्निल पाटकर, दिलीप सुरवसे, अशोक घोलप आदींनी याबाबत उपाययोजना करण्यासाठी होकार दर्शवला. सगळे व्यवहार हे रोखमुक्त व्हावेत तसेच प्रत्येकाचे पैसे आपापल्या खात्यावरून वजा व जमा व्हावेत, हातात रोकड न बाळगता, केवळ एका प्लास्टिकच्या कार्डावरून हे व्यवहार व्हावेत, ही संकल्पना त्यांनी राबवण्याचे ठरवले. त्यासाठी बँक ऑफ बडोदाशी संपर्क साधून बँक अधिकारी पृथ्वीराज माटे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर बँकेचे महाप्रबंधक नवतेज सिंग, उपमहाप्रबंधक श्रीधर राव, मुख्य प्रबंधक विजयसिंग, विपणन प्रबंधक कौस्तुभ शुक्ल यांच्या सहकार्याने गावातील व्यापाऱ्यांना प्लास्टिकच्या कार्डावरून पैसा वजा व जमा करण्यासाठी उपयोगात येणारे स्वाइप मशीन निःशुल्क पुरविण्याचे मान्य केले.

व्यापाऱ्यांना बँक अधिकाऱ्यांचे पाठबळ, गावात येऊन मार्गदर्शन
या माेहिमेसाठी गावकरी व व्यापारी यांची संयुक्त बैठक रणजित सावरकर व बँकेचे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाली. या वेळी सावरकर यांनी स्थानिकांना आपले दैनंदिन व्यवहार अगदी बारीकसारीक वस्तू घेतानाही आपल्या खात्यातून या यंत्राच्या साहाय्याने कसे भरता येतील तसेच विक्रीदारांनाही ते आपल्या खात्यात कसे जमा करून घेता येतील, याचे मार्गदर्शन केले. बँकेच्या अधिकाऱ्यांनीही या उपक्रमाला पाठबळ देत स्वतंत्र यंत्रणा व शाखा उघडण्याचा निर्णय घेतला आहे. या उपक्रमाचे अनुकरण भारतातील अन्य गावांमध्येही व्हावे तसेच अन्य बँकांनीही अशा उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घ्यावा व भारत अधिकाधिक रोखमुक्त पद्धतीने व्यवहार करण्यास प्रवृत्त व्हावा, अशी अपेक्षा रणजित सावरकर यांनी व्यक्त केली.
बातम्या आणखी आहेत...