आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढसाळ, कवाडे कॉँग्रेसकडे, महाआघाडीसाठीही प्रयत्न

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - महायुतीच्या जागावाटपावरून नाराज झालेले दलित पँथर नेते नामदेव ढसाळ यांनी बुधवारी कॉँग्रेसशी हातमिळवणी केली असून पुणे महापालिकेत कॉँग्रेसशी आघाडी करून निवडणुका लढवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. तसेच पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्याशीही मुंबईसह अन्य निवडणुकांसाठी आघाडी करण्याबाबत कॉँग्रेसच्या वतीने बुधवारी चर्चा करण्यात आली. 22 जानेवारीपर्यंत महाआघाडीची घोषणा करावी, अशी मागणी आपण काँग्रेसकडे केली असल्याचे प्रा. कवाडे यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीत शिवशक्ती-भीमशक्तीला निवडणुकीत तोडीस तोड उत्तर देण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी केली असून दलित नेत्यांना सोबत घेऊन महाआघाडी स्थापन करण्याचीही त्यांची योजना आहे. या योजनेनुसारच गेल्या काही दिवसांपासून नामदेव ढसाळ आणि प्रा. कवाडे यांच्याशी चर्चा सुरू होती. ढसाळ यांनी सांगितले की, बुधवारी काँग्रेस प्रदेश अध्यक्ष माणिकराव ठाकरे, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि पतंगराव कदम यांच्याशी चर्चा झाली. पुणे येथील घोरपडीचे रिपाइं अध्यक्ष यशवंत नडगन यांना जागा सोडण्यास शिवसेना-भाजपने नकार दिला होता, त्यामुळे ते नाराज होते. अशाच घटना अन्य ठिकाणीही घडल्याने कार्यकर्ते नाराज असल्यामुळेच पुणे येथे काँग्रेसला पाठिंबा देण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. माणिकराव ठाकरे यांनी प्रा. जोगेंद्र कवाडे यांच्याशीही बुधवारी पुन्हा चर्चा केली. दोन दिवसांपूर्वीच प्रा. कवाडे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. प्रा. कवाडे यांनी सांगितले की, काँग्रेसतर्फेच आम्हाला महाआघाडी करण्याता प्रस्ताव देण्यात आला होता. त्यानुसार बुधवारी माणिकराव ठाकरे व अन्य पदाधिकाºयांशी 2 तास सकारात्मक चर्चा झाली. 10 मनपा आणि 27 जिल्हा परिषद निवडणुकांसाठी आम्ही आमची यादी त्यांना देऊन 22 तारखेपर्यंत महाआघाडीची घोषणा करावी असे सांगितले आहे.

10 जागांची आशा
गेल्या 10-15 वर्षांपासून मुंबई मनपावर शिवसेना-भाजपची सत्ता आहे. त्यांचे काम चांगले नसल्यामुळे मुंबईकरांना परिवर्तन हवे आहे आणि महाआघाडी झाल्यास परिवर्तन नक्की होईल. आम्ही मुंबईसाठी 23 जागांची मागणी केली आहे. परंतु 10 च्या आसपास जागा आम्हाला मिळतील, अशी आशा कवाडे यांनी व्यक्त केली.