आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सरकारी बंगल्यात ढोबळेंची हातसफाई, फर्निचर, पडद्यांसह तब्बल सात लाखांच्या वस्तू लंपास

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - बेलगाम वक्तव्याने मंत्रिपदावर पाणी सोडावे लागलेल्या सोलापूरच्या लक्ष्मण ढोबळे यांनी चक्क सरकारी बंगल्यातील सामानावरच डल्ला मारल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मंत्रिपद गेल्यानंतर ढोबळे यांनी सरकारी बंगला रिकामा करत असताना या वास्तूतील टेबल, पडदे, पंखे असे सात लाखांचे सामान नेले, अशी तक्रार सार्वजनिक बांधकाम विभागाने केली आहे.


सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ या राखीव मतदारसंघातून लक्ष्मणराव ढोबळे हे राष्‍ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आले आहेत. त्यांच्याकडे पाणीपुरवठा विभागाचे मंत्रिपदही दिले होते. मात्र, चार वर्षे कोणतीच कर्तबगारी दाखवू न शकलेल्या, परंतु आपल्या बेलगाम वक्तव्याने चर्चेत आलेले ढोबळे यांचे मंत्रिपद जूनमध्ये काढून घेण्यात आले.


पंखे, गिझर, टेबल पळवले
मंत्रिपद असताना ढोबळे यांना मंत्रालयासमोरील बंगला सरकारी निवासस्थान म्हणून देण्यात आले होते. मात्र, मंत्रिपद गेल्यानंतर ढोबळे यांनी तत्परतेने बंगला रिकामा केला, परंतु बंगल्यातील पडदे, पंखे, गिझर, शेगडी, टेबल, खुर्च्या असे 7 लाख किमतीचे सामानही घरी नेले. ढोबळे यांचा हा प्रताप बांधकाम विभागाने तक्रार केल्यानंतर उघडकीस आला.


तसबिरी मात्र विसरले
ढोबळे राहत असलेल्या बंगल्याला भेट दिली असता त्यांनी त्यांच्या दिवाणखान्यात लावलेल्या शाहू, फुले, आंबेडकर यांच्या प्रतिमा मात्र जराही हलवल्या नव्हत्या, असे दिसून आले. दरम्यान सरकारचे नुकसान भरून देणार असल्याचे ढोबळे यांनी एका वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.


राष्ट्रवादीकडून पाठराखण
राष्‍ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी मात्र ढोबळे यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंते त्यांच्या चुका झाकण्यासाठी ढोबळे यांच्यावर आरोप करत असल्याचा प्रतिआरोप नवाब
मलिक यांनी केला.


धक्कादायक प्रकार
आमदार, खासदार बंगले सोडत नसल्याची अनेक प्रकरणे गाजली आहेत. रामदास आठवले यांनी दिल्लीतील निवासस्थान सोडण्यास विलंब केला, तेव्हा त्यांचे सामान रस्त्यावर टाकण्यात आले होते. मात्र, आता सरकारी बंगल्यातील सामानच घरी नेण्याचा धक्कादायक प्रकार प्रथमच उघड झाला.