आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतासाठी धोनी आदर्श क्रिकेट राजदूत होऊ शकतो, निवड समितीचे माजी प्रमुख दिलीप वेंगसरकर यांचे मत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- धोनीने वनडे, टी-२० क्रिकेटचे कर्णधारपद सोडल्याची घोषणा करून सर्वांना धक्का दिला. भारतीय क्रिकेटला कसोटी, वनडे, टी-२० क्रिकेटमध्ये सर्वोच्च स्थानावर नेणाऱ्या धोनीकडे नेतृत्वाचा राजदंड दिलीप वेंगसरकर यांनी दिला. त्या वेंगसरकरांना त्यावेळी तसे का करावेसे वाटले? त्याच्या नेतृत्वगुणाचे वैशिष्ट्य काय? याबाबतची ‘अंदर की बात’ दिलीप वेंगसरकर यांनी ‘दिव्य मराठी’ला सांगितली.  दिलीप वेंगसरकर यांच्याच शब्दांत....

महेंद्रसिंग धोनी रांचीसारख्या शहरातून पुढे आलेला, क्रिकेटचे फारसे ग्लॅमर तो आला त्या विभागाकडेही नव्हते आणि स्वत: धोनीही त्यावेळी फारसा कुणाच्या खिजगणतीतही नव्हता. राष्ट्रीय निवड समितीचा अध्यक्ष म्हणून व त्याआधी बीसीसीआयच्या गुणवत्ता शोधमोहिमेचा प्रमुख म्हणून मी त्याला बऱ्याच वेळा पाहिले.  प्रत्येक वेळी, त्याला समकालीन असलेले खेळाडू आणि तो (धोनी) यांच्यातला फरक मला जाणवायला लागला होता. मला त्यावेळी नेमके काय जाणवले ते कदाचित शब्दात सांगता येणार नाही. मात्र तो इतरांपेक्षा वेगळा होता हे लक्षात आलं होतं.  त्याचं कारण म्हणजे, त्याचा खेळाबद्दलचा दृष्टिकोन, खेळाकडे पाहण्याची त्याची दृष्टी वेगळी होती. त्याच्याकडे मी भारताचे नेतृत्व सोपविले त्यावेळी त्याने त्याच्या झारखंडचेही नेतृत्व केलेले नव्हते. तरीही मला त्याच्यातील गुण भारताला हवा असलेला कप्तान करू शकतील, असे त्यावेळी वाटले. धोनीचे मैदानावरचे व मैदानाबाहेरचे संयमी वागणे आणि परिपक्वता पाहिल्यानंतर मला वाटते तो भारताचा एक आदर्श ‘क्रिकेट राजदूत’ म्हणून ओळखला जाईल. देशाच्या तरुण खेळाडूंसाठी व इतर क्षेत्रातील तरुणांसाठीही तो एक ‘रोल मॉडेल’ ठरावा, असा तो आहे.

धोनीचे वेगळेपण....
त्याचे एक वेगळेपण म्हणजे त्याने सचिन, सौरभ, सेहवाग, लक्ष्मण, हरभजन सिंग यांच्यासारखे ७-८ सीनियर खेळाडू संघात असतानाही स्वत:वर दडपण येऊ दिले नाही. त्याने त्यांना व्यवस्थित हाताळले. 

अॅप्रोच मला आवडला...
आणखी एक गोष्ट, तो नेतृत्व करीत नव्हता, परंतु फलंदाजी करतानाचा त्याचा ‘अॅप्रोच’ मला भावला होता. कोणत्याही परिस्थितीत तो शांत, विचारी आणि संयम न सोडणारा वाटला. यष्टिरक्षणाच्या वेळी त्याचे शांत राहणे, नाटकीपणा न करणे खेळावर व त्या परिस्थितीवरच लक्ष केंद्रित ठेवणे या गोष्टींमुळे मला तो चांगला कर्णधार होऊ शकेल, असे वाटले. मला तो सेहवाग, युवीपेक्षा उजवा वाटला होता.
बातम्या आणखी आहेत...