आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुख कर्करोगावर मात करणे आता जास्त सुकर हाेणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - भारतात दरवर्षी १ लाख जणांना मुख कर्करोग होताे. पैकी सुमारे ५० % लोक मरण पावतात. मात्र, या रुग्णांना मोठा दिलासा देण्याचे काम परळच्या टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या चमूने गेल्या १० वर्षांतील संशोधनाच्या माध्यमातून केला आहे. अर्ध्या तासाच्या शस्त्रक्रियेने १ लाखांपैकी ३६ टक्के रुग्णांचा जीव वाचणार असून इतर ५५ टक्के जणांना पुन्हा या आजाराची पुनरावृत्ती होणार नाही, असा संशोधकांचा दावा आहे. मात्र, कर्कराेगाच्या प्राथमिक अवस्थेतच हे रुग्ण शस्त्रक्रियेसाठी उपलब्ध व्हायला हवे, अशी अट आहे.

टाटा रुग्णालयाकडून मंगळवारी याची माहिती देण्यात आली. डाॅ. अनिल डिक्रुझ यांच्या नेतृत्वाखाली डाॅ. राजेंद्र बडवे व डाॅ. रिचा वैश यांच्यासह १८ डॉक्टरांनी हे संशोधनकार्य केले आहे. २० ते ७५ वयोगटातील ५९६ रुग्णांवर संशोधन करून ही शस्त्रक्रिया िवकसित करण्यात आली. विशेष म्हणजे यात युवकांचे अधिक प्रमाण होते. तंबाखूजन्य पदार्थ खाणा-यांना जीभ, तोंडात जखम झाल्यानंतर ते रुग्णालयात तपासणीसाठी येतात. या वेळी त्यांच्या मानेत, जबड्यात कर्करोगाच्या गाठी पसरण्यास सुरुवात झालेली असते; परंतु त्या बाह्य रूपात दिसत नाहीत. यामुळे आपल्याला काही फार मोठे झाले नसेल, अशा आशेने तो गाठींवरील शस्त्रक्रियेसाठी फारसा राजी नसतो. जीभ व तोंडाच्या जखमेच्या पहिल्याच टप्प्यात गाठींची शस्त्रक्रिया झाल्यास रुग्ण निश्चितपणे वाचू शकतो, अशी माहिती डाॅ. रिचा वैश यांनी दिली.

शस्त्रक्रियेबद्दल डॉक्टरांत होते मतप्रवाह
ताेंडाच्या कर्करोगाच्या प्राथमिक अवस्थेत मानेतील, जबड्यातील गाठींचा शंभर टक्के अंदाज येणे शक्य नसते. या अवस्थेच्या पहिल्याच टप्प्यात शस्त्रक्रिया करायची की गाठीच्या दृश्य स्वरूपानंतर ती करायची, याबाबत डाॅक्टरांमध्ये मतप्रवाह होते. मात्र, ‘टाटा'ने अशी शस्त्रक्रिया तातडीने केल्यास रुग्ण वाचतील, अस संशोधनात सिद्ध करून दाखवले आहे.

पवारांनी काळजी घेतली, आबांनी दुर्लक्ष केले!
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनाही तोंडाचा कर्करोग झाला होता. त्यांनी प्राथमिक अवस्थेतच त्यावर उपचार करून घेतले. परंतु, माजी गृहमंत्री आर. आर. पाटील यांना कल्पना असूनही दुर्लक्ष केले. कर्करोग जबडा आणि मानेपर्यंत पसरल्यानंतर ते रुग्णालयात दाखल झाले. त्यांना वाचवण्यासाठी डाॅक्टरांनी सर्व कौशल्य पणाला लावले. मात्र, सर्व प्रयत्न करूनही आबांना वाचवण्यात यश आले नाही, अशी माहितीही कर्करोग तज्ज्ञांनी या वेळी दिली.