आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बँकांनी शाखेतून एकतरी दलित उद्योजक घडवावा - पी. चिदंबरम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - छोट्या उद्योजकांना पुरेशा प्रमाणात वित्तीय पुरवठा होणे हे नेहमीच आव्हानात्मक ठरत असले तरीही बँकांनी आपल्या प्रत्येक शाखेतून एकतरी एससी / एसटी उद्योजक घडवावा, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी केले. ‘दलित इंडिया चेंबर ऑफ कॉमर्स’च्या वतीने स्थापन केलेल्या पहिल्यावहिल्या ‘डिक्की एसएमई फंड’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
सामाजिक समता निर्माण करणारा हा पहिला दलित फंड दीर्घकाळात मोलाचे योगदान देणार आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील ‘ताजमहाल हॉटेल’ या ऐतिहासक हॉटेलच्या ‘बॉलरूम’मध्ये या फंडाचे अनावरण होत आहे ही महत्त्वाची बाब आहे. ही एक चांगली सुरुवात असून डिक्कीने लावलेल्या या रोपट्याचा लवकरच महावृक्ष होईल, असा विश्वास वित्तमंत्री चिदंबरम यांनी व्यक्त केला. वित्तमंत्र्यांच्या या विश्वासामुळे डिक्कीचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, वरहाद समूहाचे संस्थापक आणि अध्यक्ष प्रसाद दहापुते यांच्या चेहºयावर ‘आम्ही रोजगार मागणारे नाही, तर रोजगार देणारे आहोत’ ही संकल्पना प्रत्यक्ष साकार होत असल्याचा आनंद तराळताना दिसत होता.
भारतासारख्या देशात अनेक शतके देशातल्या 25 टक्के लोकांवर आतापर्यंत अन्याय झाला हे आपण मान्यच केलेले नसल्याचे सांगून चिंदरबरम यांनी आरक्षण हे एखाद्या धारधार शस्त्रासारखे असले तरी अन्य कोणताही चांगला पर्याय उपलब्ध नसल्याने या शस्त्राचा उपयोग केला जात आहे, परंतु ‘डिक्की’ने मात्र आर्थिक शक्ती हे सर्वोत्तम शस्त्र असल्याचे दाखवून दिले असून त्यांच्या या लक्षणीय उपक्रमाचे मनापासून कौतुक करावे लागेल, असेही ते म्हणाले.
सार्वजनिक खरेदी धोरणामध्ये सर्व सरकारी आणि सार्वजनिक खरेदीपैकी 20 टक्के खरेदी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांकडून (एमएसएमई) खरेदी करणे बंधनकारक केले असून त्यामध्येही चार टक्के खरेदी एससी/ एसटी उद्योजक कंपन्यांकडून खरेदी करणे आवश्यक आहे.

अहवालाचे प्रकाशन
नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉँटेकसिंग अहलुवालिया यांच्या हस्ते ‘ एमएसएमई : द अपॉर्च्युनिटी नॉक्स’ या विशेष अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. डिक्कीचे मेंटॉर चंद्रभान प्रसाद, एनबीएसीच्या अध्यक्ष कल्पना सरोज, बीएसईचे व्यवस्थापकीय संचालक आशिषकुमार, वरहाद कॅपिटलचे संचालक आणि सहसंस्थापक सचिन गुप्ता आणि अनेक उद्योजक याप्रसंगी उपस्थित होते.