मुंबई - मराठवाड्यातील दुष्काळाच्या प्रश्नावरून काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद अाहेत. मराठवाड्यातील पाच दुष्काळग्रस्त जिल्ह्यांमधील शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफीची मागणी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना भेटून केली अाहे. काँग्रेस मात्र यासाठी तयार नाही. ज्या गावची पैसवारी गेल्या तीन वर्षांपासून ५० पैशांपेक्षा कमी आहे त्या गावांमधील शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, अशी आमची मागणी आहे, अशी भूमिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत मांडली.
‘केवळ दुष्काळग्रस्त जिल्ह्यांना कर्जमाफी देऊन हा प्रश्न सुटणार नाही. त्यापेक्षा गावातील पैसेवारीवरून कर्जमाफीचा निर्णय घ्यायला हवा. तशी मागणी आम्ही मुख्यमंत्र्यांकडे करणार आहोत. युती सरकार हे शेतकरीविरोधी आहे. शेतक-यांच्या हिताचे निर्णय घेण्याऐवजी सध्या उद्याेगाच्या नावाखाली उद्योजकांचे हित जपले जात आहे,’ असा अाराेपही चव्हाण यांनी केला. एलबीटी रद्द करण्यासाठी राज्य सरकार व्हॅटवर सरचार्ज लावणार अाहे. मात्र काँग्रेस त्याला कडाडून विरोध करेल, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.
धनगर आरक्षणाबाबत सरकार गंभीर नाही
धनगर आरक्षणाबाबत हे सरकार गंभीर नाही. निवडणूक जिंकण्यासाठी भाजपने या आरक्षणाचे गाजर दाखवले होते, पण आता त्यांचा अभ्यासच सुरू आहे. ही फसवणूक असून मुख्यमंत्री फडणवीस यांनी याबाबत आपले धोरण निश्चित करावे, अशी मागणीही चव्हाण यांनी केली.