आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

असंतोष कमी करण्यासाठी कर्जमाफीचे वेगवेगळे टप्पे; शेतकऱ्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई  - ‘राज्य सरकारने दिवाळीत काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम वर्ग करून शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यास सुरुवात केली आहे. या प्रक्रियेचे अाम्ही स्वागत करताे,’ अशी प्रतिक्रिया शेतकरी अांदाेलन सुकाणू समितीने दिली अाहे. मात्र एकूण किती लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होईल व एकूण किती हजार कोटींचे कर्ज माफ केले जाईल, याबाबत स्पष्ट आकडेवारी मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली नाही. उलट सरकारच्या अटी-शर्तींमुळे वाढता असंताेष कमी करण्यासाठीच सरकारकडून  तुकड्या-तुकड्याने कर्जमाफी केली जात अाहे,’ असा अाराेपही समितीचे राज्य समन्वयक व महाराष्ट्र किसान सभेचे सरचिटणीस डाॅ. अजित नवले यांनी केला अाहे.   
 
सरकारने कर्जमाफीसाठी ज्या अटी-शर्ती लागू केल्या त्यामुळे लाखो शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहणार आहेत. लाखो शेतकऱ्यांचा हा असंतोष एकदम भडकू नये यासाठीच सरकारने कर्जमाफीच्या प्रक्रियेचे असे टप्पे केले आहेत. शेतकऱ्यांमध्ये फूट पाडून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.  ८९ लाख बँक खातेदार शेतकऱ्यांपैकी अाज केवळ ८.५ लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्यात आली आहे, याकडेही डाॅ. नवले यांनी लक्ष वेधले.   

प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात जी अत्यल्प आकडेवारी सरकारने समोर ठेवली, त्यातही पुन्हा नवी विसंगती समोर आली आहे. कर्जमाफीसाठी ऑनलाइन अर्ज सादर करण्याची मुदत संपताना २१ सप्टेंबर रोजी राज्यभरातील ५८ लाख शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केल्याचे जाहीर करण्यात आले होते. राज्यभरातील ९८ लाख बँक खातेदार शेतकऱ्यांपैकी केवळ ५५ लाख शेतकऱ्यांचेच ऑनलाइन अर्ज प्राप्त झाल्याचे मुख्यमंत्री सांगत अाहेत. अटी-शर्तींमुळे, किचकट प्रक्रियेमुळे व आधार कार्डसारखी कागदपत्रे उपलब्ध नसल्याने राज्यभरातील ४३ लाख शेतकरी अर्जच करू शकलेले नाहीत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.  

शेतकऱ्यांत फूट पाडण्याचा प्रयत्न  
दीड लाखावर असलेली ही कर्ज रक्कम एकरकमी भरल्याशिवाय शेतकऱ्यांना प्राेत्साहन रकमेचा लाभ मिळणार नाही. मात्र शेतीत होत असलेला तोटा पाहता शेतकऱ्यांना एकरकमी पैसे भरून कर्जफेड करणे शक्य नाही. परिणामी अर्ज केलेल्या ५५ लाख शेतकऱ्यांपैकी अनेक शेतकरी लाभापासून वंचित राहणार आहेत. इतरही अनेक अटी लागू असल्याने अर्ज केलेल्या ५५ लाख शेतकऱ्यांपैकी अत्यल्प शेतकरीच कर्जमाफीसाठी पात्र ठरणार आहेत. सरकारला याची पुरेपूर कल्पना आल्यानेच अपात्र ठरलेल्या लाखो शेतकऱ्यांचा असंतोष एकदम भडकू नये यासाठी सरकारने कर्जमाफीचे अनेक छोटे-छोटे टप्पे करत शेतकऱ्यांची एकजूट होऊ नये यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शेतकऱ्यांत फूट पाडण्याचा हा प्रयत्न असल्याचे डाॅ. नवले म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...