आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

EXCLUSIVE: शहीद जवानांच्या विधवांची परवड; नोकरी मिळण्यासाठी सुरू आहे धडपड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वय २० ते २५, हातात एक-दोन मुलं, काहींना सासर-माहेरचा आधार, काहींना तोही नाही. पतीच्या निधनाच्या धक्क्यातून सावरून, कुणी पूर्वपरीक्षेचा अभ्यास करत आहे तर कुणी फिजिकल फिटनेससाठी परिश्रम घेत आहेत. खंबीरपणे त्या झटत आहेत स्वत:च्या पायावर उभं राहण्यासाठी आणि मुलांच्या भवितव्यासाठी. या कथा आहेत राज्यातील २० वॉर विडोज अर्थात शहीद जवानांच्या पत्नींच्या. कुपवाडा, उरी अतिरेकी हल्ला व काश्मिरातील हिमस्खलनात शहिदांच्या या पत्नी. सरकारी सेवेत अनुकंपा तत्त्वावर नोकरी मिळावी म्हणून वर्षभरापासून झगडत आहेत.
 

सरकारदरबारी वारंवार अर्ज-विनंत्या करूनही त्यांच्या मागण्या अपूर्णच आहेत. शहीद जवानांच्या अंत्ययात्रेच्या दिवशी आवर्जून उपस्थित झालेल्या एकाही नेत्याने त्या दिवसानंतर या विधवांचा जगण्याचा झगडा कसा सुरू आहे, त्यांच्या काय मागण्या आहेत आणि त्यांना नोकरीची का गरज आहे हे जाणून घेण्यासाठी त्यांना संपर्क केलेला नाही. वीस ते पंचवीस वयोगटांतील आणि शैक्षणिक पात्रतेत बसणाऱ्या फक्त २० ते २५ वॉर विडोज सरकारकडे नोकरीसाठी अर्ज-विनंत्या करीत आहेत. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापासून सैनिक कल्याणमंत्री संभाजीराव निलंगेकर यांच्यापर्यंत पाठपुरावा केला आहे. परंतु, अद्याप एकीलाही नोकरी न मिळाल्याने त्यांचा संघर्ष सुरूच आहे. शहीद जवानांच्या मुलांना शिक्षण मोफत मिळावे असाही जीआर आहे, परंतु त्याचीही अंमलबजावणी होत नसल्याने या विधवांच्या अडचणी जास्तच वाढल्या आहेत. यापैकी बहुतेकींची पाच ते पंधरा या वयोगटांतील मुले आहेत. त्यामुळे त्या जीआरची अंमलबजावणी झाली तरी त्यांना दिलासा मिळू शकतो, असे कुलकर्णी म्हणाले. पावसाळी अधिवेशनाच्या निमित्ताने त्यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडेंना संपर्क करून याबाबतची अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे.
 
वणवण करावी लागणे शरमेचे
सीमेवर शहिदांच्या या विधवा दुर्गम भागातील आहेत. तिथे शिक्षण, रोजगाराची साधने नाहीत. त्यांची मुले ५ ते १५ वयोगटातील आहेत. वीरमाता, वीरपत्नींना रोजगारासाठी वणवण, विनंती अर्ज घेऊन शासनदरबारी चकरा मारायला लागणे ही सर्वांच्याच दृष्टीने अत्यंत शरमेची बाब आहे.
- प्रमोद कुलकर्णी, सचिव, माजी सैनिक संघटना

सैनिक कल्याण बोर्डाच्या विनंतीवरून आम्ही त्यांचा ग्रुप केला. पतीच्या वीरमरणानंतर त्या कोसळून गेल्या. आम्ही त्यांना त्या धक्क्यातून बाहेर काढले. मात्र, पेन्शन वा सासर, माहेरच्यांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी नोकरीची त्यांची मागणी रास्त आहे.
- ज्योत्स्ना गर्गे, वेल्फेअर ऑफ आर्मी वॉर विडोज
 
बातम्या आणखी आहेत...