आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Difficulty Management Learn At June In School Maharashtra

जूनपासून शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षणाचे धडे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- आपदग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या किमान मदतीबाबत राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे निकष आता राज्यातही लागू केले जाणार आहे. त्यानुसार राज्यातील आपत्ती व्यवस्थापनाबाबत नव्याने तयार करण्यात आलेल्या धोरणास बुधवारी मान्यता देण्यात आली.

आपत्ती काळात विद्यार्थ्यांना सज्ज राहण्यास तयार करण्यासाठी तीन हजार ५०० शाळांमध्ये येत्या शैक्षणिक सत्रापासून म्हणजे जून महिन्यापासून शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रम राबविण्यात येणार असल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन केंद्रातील अधिकाऱ्याने दिली. शाळांना दिल्या जाणाऱ्या प्रशिक्षणाबाबत दिव्य मराठीनेच याबाबतचे वृत्त सर्वप्रथम प्रकाशित केली होती.

सह्याद्री अतिथीगृह येथे बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्य अापत्ती व्यवस्थापन समितीची बैठक झाली. त्यात राज्यातील परिस्थितीचा अाढावा घेण्यात आला. २० वर्षांपासून राज्याचा आपत्ती व्यवस्थापनाचा आराखडा तयार केलेला होता. त्यात सुधारणा करण्याची आवश्यकता होती. अाता सुधारणा करून नवीन आराखडा तयार करण्यात आला आहे. राज्य आपत्कालीन केंद्राच्या आधुनिकीकरणासोबतच जिल्हा आपत्कालीन केंद्रांची देखील उभारणी करण्यात येणार असल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले.

एखाद्या नैसर्गिक आपत्तीनंतर आता आपदग्रस्तांना राहण्यासाठी छावण्या, जेवण, शुद्ध पाणी, प्रसाधनगृहे आदी सुविधा राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या निकषानुसार पुरविण्यात येणार आहेत. शाळांमधील आपत्ती व्यवस्थापन कार्यक्रमाबाबत माहिती देताना या अधिकाऱ्याने सांगितले, ‘राज्याच्या ३६ जिल्हयांतील प्रत्येकी ५० या प्रमाणे एकूण १,२५० शिक्षकांना मास्टर ट्रेनर्सचे प्रशिक्षण देण्यात येणार. पुणे आणि सातारा जिल्हयातील प्रत्येकी २०० शाळांमध्ये प्रायोगिक तत्वावर हा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला होता. या प्रकल्पाअंतर्गत १२६ तज्ज्ञ मार्गदर्शक २७५७ शिक्षकांना ५७ प्रशिक्षण कार्यक्रमांमधून प्रशिक्षित करण्यात आले. आता अन्य जिल्ह्यांमध्ये शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी अर्थसंकल्पात भरीव निधीचीही तरतूद करण्यात आली आहे, प्रत्येक जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती आणि तेथे उद्भणाऱ्या नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन तशा प्रकारचे प्रशिक्षण त्या- त्या जिल्ह्यातील शिक्षकांना दिले जाणार आहे. हे शिक्षक नंतर विद्यार्थ्यांना शाळेमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देतील.’

>तज्ज्ञांकडून शिक्षकांना प्रशिक्षण

>सर्व शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापन आराखडे तयार करण्यात येणार

>विद्यार्थी शिक्षकांत जनजागृती अभियान राबवण्यास प्राधान्य. Áसर्व शाळांमध्ये सुरक्षा कवायत घेणे, वाचन साहित्य तयार करणे, सर्व शाळांचे जलद सर्वेक्षण

>मदत बचाव कार्यासाठीचे साहित्य, प्रथमोपचार पेटी आदी साहित्य पुरवणे.

‘अचूक हवामान केंद्रे’
हवामानाचा अचूक अंदाज दिला तर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान थांबू शकते. त्यासाठी कर्नाटकच्या धर्तीवर अचूक हवामान अंदाज केंद्रे उभारण्याचा प्रस्ताव आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर जागतिक तापमानवाढ त्याचे कृषी क्षेत्रावर होणारे दुष्परिणाम याबाबत त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा अभ्यास गट नेमून कायमस्वरुपी उपाययोजनेबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक असल्याचे कृषीमंत्री एकनाथ खडसे म्हणाले.