आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाराज मनोहर जोशी मनसेच्या वाटेवर?, उमेदवारीसाठी डावलले जात असल्याची भावना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीच्या मुद्द्यावरून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज झालेले शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी मनसेच्या वाटेवर असल्याचे वृत्त आहे.


मुंबई महापालिका निवडणुकीत दादर भागात शिवसेनेचा पूर्ण सफाया होऊन मनसेचा विजय झाला होता. मनोहर जोशींच्या मतदारसंघात असलेला हा भाग गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. मात्र या किल्ल्यालाच खिंडार पडल्याने दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जोशींवर नाराज झाले होते. तेव्हापासून जोशी पक्षात अडगळीला पडले आहेत.


दरम्यान, आगामी लोकसभा निवडणूक दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून लढविण्याची जोशी यांनी तयारी केली आहे. खुद्द उद्धव ठाकरे यांनीच आपल्याला तसा आदेश दिल्याचा त्यांचा दावा आहे. मात्र गणेशोत्सवाच्या काळात मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीचे अध्यक्ष राहुल शेवाळे यांनीही जोशींच्या मतदारसंघात पोस्टर्स लावून आपणही उमेदवारीच्या शर्यतीत असल्याचे दाखवून दिले. त्यामुळे जोशी सर नाराज झाले आहेत.


उद्धव शेवाळेंच्या पाठिशी
दोन दिवसांपूर्वीच ‘मातोश्री’वर जाऊन जोशी यांनी उद्धव यांच्याकडे नाराजी व्यक्तही केली. मात्र शेवाळेंना आपणच वातावरणनिर्मिती करण्यास सांगितल्याचे उद्धव यांनी सांगितल्याने त्यांचा भ्रमनिरास झाला. ‘पक्षात पूर्वी असे कधी झाले नव्हते,’ अशी हताश प्रतिक्रियाही त्यांनी दिली होती.


राज यांच्याकडून निमंत्रण
शिवसेनेतील नाराजीची खबर लागताच राज ठाकरे यांनी मनोहर जोशींना मनसे प्रवेशाचे निमंत्रण धाडले. राज व जोशी यांचे मधुर संबंध सर्वश्रुत असल्याने ते या निमंत्रणाचा स्वीकार करतील, अशी चर्चा आहे.