आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मराठा विद्यार्थ्यांना एमबीबीएस अभ्यासक्रमातही सवलत द्या; मराठा मोर्चाची मागणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- मराठा मोर्चाला दिलेल्या आश्वासनानुसार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील (ईबीसी) विद्यार्थ्यांना ६०५ अभ्यासक्रमांसाठी शिष्यवृत्ती मान्य केलेली ५० टक्के गुणांची अट या शैक्षणिक वर्षापासून लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. मात्र, यात एमबीबीएस व बीडीएससारखे अभ्यासक्रम वगळण्यात आले आहेत. या अभ्यासक्रमांचाही सरकारने सवलतीच्या विषयांत समावेश करावा, अशी मागणी मराठा मोर्चाच्या वतीने मंगळवारी मंत्रिमंडळ उपसमितीसमोर मांडण्यात आली. या मागणीचा विचार करण्यात येईल, असे आश्वासन या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.

  
फडणवीस यांनी मराठा समाजातील विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणे शैक्षणिक सवलती देण्याचे मान्य केले होते. कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय, मत्स्यव्यवसाय आणि वैद्यकीय शिक्षण, औषधद्रव्ये विभागाच्या अखत्यारीतील व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेणाऱ्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना याचा लाभ होणार आहे. मात्र, एमबीबीएस, बीडीएससारख्या मोठ्या व महागड्या अभ्यासक्रमांसाठी याचा लाभ मराठा विद्यार्थ्यांना घेता येणार नाही. आर्थिकदृष्ट्या दुर्बल मराठी समाजाला सवलत दिली जात असताना या अभ्यासक्रमांचाही समावेश सरकारने करावा. जेणेकरून मराठा समाजाचे विद्यार्थ्यांना या विषयांत गुणवत्ता मिळवण्यास लाभ होईल, अशी मागणी मराठा उपसमितीच्या बैठकीत उपस्थित मोर्चाच्या अभ्यास गटाने केली.  


एमबीबीएस आणि बीडीएससारख्या अभ्यासक्रमांचे शुल्क आधीच भरमसाठ असते. त्यात राज्यात आणि केंद्रात या अभ्यासक्रमांच्या जागा मर्यादित असल्याने प्रवेशासाठी माेठ्या प्रमाणात स्पर्धा असते. आधीच आरक्षण नसल्याने गुणवत्ता असूनही मराठा समाजातील विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमांच्या जागांना मुकावे लागते. त्यामुळे निदान इतर अभ्यासक्रमांप्रमाणे यांचा समावेश करून मराठा समाजातील विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, या मागणीचा सहानुभूतिपूर्वक विचार केला जाईल, असे आश्वासन मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून देण्यात आले आहे. 

 

४ महिन्यांनंतर तीव्र आंदोलनाचा इशारा
मराठा समाजाच्या मागण्यांना आतापर्यंत फक्त आश्वासन दिले जात आहे. मंत्रिमंडळ उपसमिती आणि मराठा मोर्चाच्या आतापर्यंत तीन बैठका झाल्या. मात्र, आश्वासनांच्या पलीकडे फारसे काही मिळालेले नाही. यामुळे आणखी ४-५ महिने वाट पाहिली जाईल. मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा मोर्चाच्या वतीने देण्यात आला.  

 

बातम्या आणखी आहेत...